सोलापूर (हिं.स.) : देशातील अतिरिक्त १० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी, ज्यामध्ये कच्ची साखर आणि बंदरावरील साखरेला प्राधान्य देण्यात यावे, या मागणीचे निवेदन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिले होते. त्यांनी निवेदनाची दखल घेत साखर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करत २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयाचा फायदा देशातील साखर कारखान्यांना व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.
यावर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांशी साखर कारखान्यांकडे कच्ची आणि पक्की साखर पडून आहे. त्यांच्याकडे कच्च्या साखरेचा पाच लाख टनाचा साठा शिल्लक आहे. तर विविध बंदरांवर सुमारे २ लाख टन कच्ची साखर पडून आहे. मात्र निर्यातीवर निर्बंध आल्याने या साखरेचा दर्जा खालावण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचबरोबर दर ढासळून साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते.