नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विम्बल्डन २०२२ च्या उपांत्य फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या कॅमरून नॉरीला पराभूत केले. या विजयासह जोकोविचने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये धडक देणारा खेळाडू ठरला आहे. जोकोविचने ३२ वेळा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या कामगिरीसह त्याने रॉजर फेडररला मागे टाकले आहे. रॉजर फेडररने ३१ वेळा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.
विम्बल्डन २०२२ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पहिल्या मानांकित जोकोविचला नवव्या मानांकित नॉरीविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. या सामन्यातील पहिला सेट मध्ये नॉरीने जोकोविचचा २-६ असा पराभव केला. मात्र, पुढील तीन सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करत नॉरीचा ६-३, ६-२ आणि ६-४ असा पराभव करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
जोकोविचने आतापर्यंत सहा वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने मागील तीन वेळा विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचच्या नावावर २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत तो फेडररसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत राफेल नदाल अव्वल स्थानी आहे. नदालने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. नदालचा विक्रम मोडण्यापासून जोकोविच दोन ग्रँडस्लॅम दूर आहे.
विम्बल्डन २०२२ च्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन खेळाडू किर्गिओस याच्याशी भिडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुखापतीमुळे राफेल नदालने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली. त्यानंतर किर्गिओसला उपांत्य फेरीत वॉक ओव्हर मिळाला होता. ज्यामुळे किर्गिओसला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे.