Friday, November 14, 2025

महाराष्ट्रातील भाविक ढगफुटीत अडकले, आळंदीच्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्रातील भाविक ढगफुटीत अडकले, आळंदीच्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अमरनाथ : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीत आळंदी येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० जण बेपत्ता आहेत.

या दुर्घटनेवेळी आळंदी येथील काही भाविकही तिथे होते. आळंदीतील अजय सोनुने महाराज आळंदी परिसरातील ५० भाविकांना घेऊन अमरनाथला गेले होते. शुक्रवारी दर्शन करून परत येत असताना अचानक ढगफुटी झाली.

यात या महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित सगळे भाविक सुखरूप असून बेस कॅम्पकडे परतत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. इतर पर्यटक संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा गुहेजवळच तब्बल १० ते १५ हजार भाविक हजर असल्याचे सांगितले जात आहे. ढगफुटीचे वृत्त कळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत मोठ्या संख्येने भाविक वाहून गेले होते. ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले २५ टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले. पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी जमा झाले आहे.

घटनास्थळावरून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ४० जण अजूनही बेपत्ता असून ६४ जण जखमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >