Monday, June 30, 2025

मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; पुराचा आढावा घेत दिले निर्देश

मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; पुराचा आढावा घेत दिले निर्देश

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच आसना नदीला देखील आलेल्या पुराने किन्होळा गावात पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनेची दखल घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून यासंबंधीत विचारणा केली आहे.


आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत.


नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ रेस्क्यू करा आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल करून सूचना दिल्या आहेत.


यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले.

Comments
Add Comment