मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हचा नेहमीचा पॅटर्न बदलत आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे केवळ एकतर्फी जनसंवाद न होता, पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे सामोरे जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु उद्धव ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळले. शिवसेना, धनुष्यबाण, निवडणूक चिन्ह, शिंदे गट, टीका-टोमणे, अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक टाळले.
एकही महापालिका सध्या अस्तित्त्वात नाही, त्यामुळे सोडून गेले ते नगरसेवक नाही, तर कार्यकर्ते असतील. शिवसेनेने कोणाची पार्श्वभूमी न पाहता साध्या लोकांना मोठे केले, मोठी झालेली लोकं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती साधी माणसं शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भवितव्याला धोका नाही, अशी खात्री ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना ही गोष्ट नाही की कोणी घेऊन पळत सुटला. हा रस्त्यावरचा पक्ष आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
धरून चाला की कधीकाळी आमचाही एकच आमदार होता, तेच पक्ष सोडून गेले असते म्हणजे पक्ष संपला का? १, ५०, १०० आमदार गेले तरी पक्ष संपू शकत नाही, पक्ष कायम राहतो, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो आहे, विधिमंडळ पक्ष आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
मी माझ्या सैनिकांवर दडपण वाढेल, असे बोलत राहिलो तर योग्य नाही. दडपण हलकं करणं हे माझं काम आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत चर्चा सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीने बघितले, तर धनुष्य बाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, ती चिंता सोडा. आता मतदान करताना मतदार त्या माणसाचा आणि चिन्हंही लोक बघतात, लोक विचार करुन मतदान करतात. मागच्या काळात काय झालंय हे सांगितलं. याचा अर्थ चिन्ह सोडायचं असं नाही, मी कायदेतज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माशाचे अश्रू दिसत नाहीत
“आषाढी एकादशी जवळ आली आहे. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरल जाईन, दर्शन घेईन. मातोश्रीवर जनतेचे लोढेंच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असे बोलणार नाही. शिवसेना प्रमुखांना मागे एकदा विचारलं होतं की तुम्हाला वाईट वाटतं की नाही? त्यावेळी ते म्हणाले होते की माशाचे अश्रू दिसत नाहीत… भावना मलाही आहेत, वाईट मला ही वाटलं. मी आजही बोलेन, उद्याही बोलेने… माझ्या सैनिकांवरचं दडपण कमी करणं हे काम आहे. मला जो त्रास झाला तो कोणाला झाला नसेल” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.