Friday, October 24, 2025
Happy Diwali

मोहम्मद जुबेरला सशर्त अंतरिम जामीन मंजूर

मोहम्मद जुबेरला सशर्त अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली (हिं.स.) : द्वेषपूर्ण कंटेनच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेला अल्ट न्यूजचा संस्थापक मोहम्मद जुबेरला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी त्याला हा जामिन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, त्यानंतरही जुबेरला दिल्ली पोलिसांच्या ताब्यातच रहावे लागणार आहे.

दिल्ली पोलिसांनी जुबेरला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर झुबेरने सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जुबेरला या खटल्याशी संबंधित मुद्द्यावर कोणतेही नवीन ट्विट करणार नाही तसेच सीतापूर दंडाधिकारी न्यायालयाचे कार्यक्षेत्र सोडणार नाही या अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जुबेरने स्वत:च्या जीवाला धोका असल्याचे कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जामीन न देण्याची शिफारस केली. झुबेरने नुसते ट्वीट केले नसून त्याला असे गुन्हे करण्याची सवय आहे, असे त्यांनी सांगितले. सॉलिसिटर जनरल म्हणाले की १ जून रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आणि १० जून रोजी उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.

त्यानंतर अनेक तथ्य लपवून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही सर्व वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयापासून लपवण्यात आली असून, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे जुबेरला जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने जुबेरला ५ दिवसांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >