Thursday, November 7, 2024
Homeताज्या घडामोडीबुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी सतीश अग्निहोत्रींची रेल्वेकडून हकालपट्टी

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी सतीश अग्निहोत्रींची रेल्वेकडून हकालपट्टी

नवी दिल्ली : गैरव्यवहार प्रकरणी रेल्वेने नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. अग्निहोत्री सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निहोत्री यांचा कार्यभार एनएचएसआरसीएल प्रकल्प संचालक राजेंद्र प्रसाद यांच्याकडे तीन महिन्यांसाठी देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एनएचएसआरसीएल हा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकार आणि भागीदार राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे. ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.

अधिकृत पदाचा गैरवापर आणि खासगी कंपनीकडं अनधिकृतपणे निधी हस्तांतरित करणं यासह अग्निहोत्रींवर अनेक आरोप आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अग्निहोत्रींच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय लोकपाल न्यायालयाच्या २ जूनच्या आदेशानंतर आला आहे. या आदेशात एनएचएसआरसीएलच्या माजी एमडीनं एका खासगी कंपनीसोबत एकमेकांच्या फायद्यासाठी केलेल्या कथित कराराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले होते.

अग्निहोत्री यांनी रेल्वे विकास निगम लिमिटेडचे संचालक म्हणून नऊ वर्षांच्या कार्यकाळात ही कामं केल्याचा आरोप आहे. अग्निहोत्री यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत कोणताही गुन्हा करण्यात आला आहे की नाही हे शोधण्यासाठी लोकपाल न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले होते. तसंच, चौकशी अहवाल सहा महिन्यांत किंवा १२ डिसेंबर २०२२ पूर्वी लोकपाल कार्यालयात सादर करावा, असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.

अग्निहोत्री यांनी निवृत्तीनंतर वर्षभरातच एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केल्याचा आरोपही अधिकाऱ्यांनी केला आहे. हे सरकारी नियमांचे उल्लंघन आहे, जे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्राच्या परवानगीशिवाय सेवानिवृत्तीनंतर एक वर्षापूर्वी कोणतीही व्यावसायिक नियुक्ती स्वीकारण्यास प्रतिबंधित करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -