वसुंधरा देवधर
शेवग्याच्या २ शेंगांची जास्तीत जास्त किंमत किती असेल? चक्क बिलात लिहून आलेली आणि ऑनलाइन खरेदी असल्याने देऊनसुद्धा टाकलेली. कल्पना ही करता येणार नाही इतकी. २२९ रुपये फक्त. आता हे लक्षात आले ते ग्राहकाने बिल वाचले म्हणून. (नाहीतर बिल वाचणारे आणि ते वाचून शंका आल्यास खुलासा मागणारे जागरूक ग्राहक किती, हाही एक सर्वेक्षणाचाच विषय आहे.) गेल्या काही काळात अनेकांच्या सवयीच्या झालेल्या पोर्टलवरून खूप साऱ्या भाज्या-फळे नेहमी मागवणारे, हे चेन्नईचे ग्राहक मात्र जागरूक होते. २० रुपयाला मिळणाऱ्या, शेवग्याच्या २ शेंगाची २२९ रुपये ही किंमत वाचून त्यांनी स्विगीच्या ग्राहक तक्रार कक्षाशी लगेच संपर्क साधला. मात्र त्यांचे पैसे परत करण्यास चक्क नकार मिळाला. ही घटना आहे १२ जूनची.
अशा अनेक तक्रारी स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही फूड व्यावसायिकांच्या (एफबीओ) विरुद्ध केल्या गेल्यात. अगदी भारतातील विविध शहरांतून. शशिकुमार, मोहन, अभिषेक, राठोड, नयनार, चिरू अशा नावानिशी या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पैसे घेऊनसुद्धा माल द्यायचाच नाही, पैसे परत करायला नकार द्यायचा, ‘चार ते सात दिवसांत देतो म्हणाले, पण पैसे परत आलेच नाहीत’, मटण बिर्याणी मागवली, तर चिकन बिर्याणी पाठवली, मागवलेल्या भाज्या अतिमहाग होत्या, मिळालेला बर्गर पॅकिंगला इतका चिकटून बसला की, खाणे अशक्य, ऑर्डर मिळालीच नाही तरी अॅपवर ती ‘पोहोचली’, असा संदेश आला आणि ग्राहकाचे म्हणणे मान्य झालेच नाही... एक ना दोन. स्विगीविरुद्ध १,९१५ आणि झोमॅटोविरुद्ध २,८२८ तक्रारी गेल्या वर्षभरात दाखल झाल्या.
या तक्रारी उपभोक्ता मामले (डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेयर्स) खात्याच्या वेबसाइटवर करण्यात आल्यात. त्यांची योग्य ती दखल घेऊन सदर कार्यालयाने ऑनलाइन फूड बिझनेस करणाऱ्या सेवा पुरवठादारांना त्यांच्या एकूण व्यवसाय पद्धतीत सुधारणा करण्यास सांगितले आहे. त्यासाठी उपभोक्ता मामले विभागाच्या सचिवांनी एक सभा घेऊन ग्राहकांच्या तक्रारींची दाखल घेणे आणि त्या योग्य प्रकारे सोडविणे, यासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश सर्वच इ-कॉमर्स एफबीओंना दिले आहेत. यावरून ग्राहकांना गृहीत धरण्यात हे व्यावसायिक किती हुशार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. तसेच तीन हजारांहून जास्त ग्राहकांनी तक्रारी केल्यात, याचा अर्थ, काही लाख ग्राहकांना या व्यावसायिकांनी वेठीला धरले असणार. कारण यांचा व्यवसाय अखिल भारतीय पातळीवर चालणारा आहे. देशभरातून दिवसाला लाखो ग्राहक यांच्या अॅपवरून खाद्यपदार्थ मागवित असतात. अनुभव असा की, हजारात एखादा पीडित ग्राहक तक्रार करतो, पाठपुरावा करतो आणि उरलेले ९९९ जाऊ दे, काय होणारे तक्रार करून, उगीच वेळ वाया जाईल, दोन चारशे रुपयांनी आपल्याला काय खास फरक पडतोय, असे आणि अशा प्रकारचे विचार करून दोन ओळींची तक्रार करत नाहीत. पण त्यामुळेच या व्यावसायिकांचे फावते, हे ध्यानात ठेवले पाहिजे.
ज्यावेळी ऑनलाइन खरेदी होते त्यावेळी नियम आणि अटी मान्य करूनच पुढे जावे लागते. मात्र खरेदीची घाई इतकी असते की, त्या नियम आणि अटींकडे एक धावती नजर टाकावी, असे कुणाला वाटत नाही. कबूल-कबूल-कबूल करत ऑनलाइन खरेदीचा आनंद साजरा होतो. त्या त्या व्यवसायाच्या वेबसाइटवर उत्पादनाविषयी मते दिलेली असतात. स्टार रेटिंगसुद्धा असते. अनेक ग्राहक यावर आंधळा विश्वास ठेवतात. असे करण्यापेक्षा, या सरकारी साइटवर जाऊन, त्या उत्पादनाबद्दल कुणी काही तक्रार केली आहे का, असा शोधही अवश्य घ्यावा. याचे प्रमुख कारण म्हणजे, बरेच उत्पादक प्रतिकूल प्रतिसाद त्यांच्या वेबसाइटवर दाखवित नाहीत. ही गोष्ट लोकल सर्कलने केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. तसेच काही ग्राहक केवळ महाग म्हणजे उत्तम असे समजतात, तर काही ‘फ्लॅश सेल’मध्ये डोळे मिटून खरेदी करतात. अॅप आधारित खरेदी हा अजून वेगळा प्रकार. स्विगी, झोमॅटो यांसारखी आणखीन कितीतरी अॅप्स वापरून खरेदी होते. तुम्ही जितकी जास्त खरेदी कराल, त्यावर तुम्हाला स्टेटस दिले जाते. कुठे पॉइंट्स मिळतात. हे सगळे विक्री वाढविण्याचे मंत्र आहेत. ग्राहकाचा अहंकार गोंजारून त्याला खिशात हात घालायला उद्युक्त करण्याची तंत्रे आहेत, हे ओळखले पाहिजे. आता आपल्या देशात अनेक व्यवहार ऑनलाइन होत आहेत. सुरुवातीचे आश्चर्य, आनंद आणि अभिमानाचे दिवस मागे टाकायला हवेत. या सर्व व्यवहारांकडे आणि व्यवसायांकडे बारकाईने बघायला हवे. त्यांच्याकडून ग्राहकांना गृहीत धरले जाणार नाही, यासाठी प्रत्येक ग्राहकाने सतत दक्ष राहायला हवे. त्याला पर्याय नाही. तसेच आपण खाद्य पदार्थ मागवतो, त्याचा दर्जा, ताजेपणा, पॅकिंग याकडेसुद्धा लक्ष असायला हवे. हा आपल्या आरोग्याचा ही प्रश्न असतोच, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. म्हणून ‘फसवणूक झाली, तर करा तक्रारी’, व्यावसायिकांना कळू दे जबाबदारी. https://www.consumercomplaints.in ही लिंक वापरून कुणीही विविध उत्पादनांच्या तक्रारी पाहू शकतो आणि तक्रार करू शकतो.
mgpshikshan@gmail.com