Friday, March 21, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्गातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्गातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला आहे. दिवसभर पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे नदीनाल्याना पूर आला आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

बांद्याजवळ तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आल्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक सकाळपासून बंद आहे. वेंगुर्ले-सावंतवाडी या मुख्य मार्गावर तळवडा आणि मातोंडला जोडला जाणाऱ्या होडावडा पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक आज सकाळ पासून पूर्णतः ठप्प झाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी या परिस्थितीची पाहणी केली.

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यांतील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी छोटे छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या मार्गावरची वाहतूक बंद पडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. एनडीआरएफची टीम आज दोडामार्गमध्ये दाखल झाली आहे.त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. ८ जुलै ते १२ जुलै २०२२ या कालावधीत ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ५.३ ते ४.२ मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर उसळण्याची शक्यता आहे.

तरी समुद्र किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या सर्व मच्छिमार आणि नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये व मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोर पालन करावे. कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षाता घेण्याचे आवाहन चि.सं.जोशी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी, परवाना विभाग, वेंगुर्ला यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -