मुंबई : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. तसेच आता कायदेशीर लढाईमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते, अशी चिंता उद्धव ठाकरे यांना सतावत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी अजूनही वेळ गेलेली नाही आमची उद्धव ठाकरेंना विनवणी आहे की त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी आणि सुवर्णमध्य काढावा, असे म्हटले आहे.
“वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंबाबत मी काही बोलणार नाही असे याआधीही मी स्पष्ट केले आहे. वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला तर मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. अमित शाह, नड्डांशी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. काही कारणामुळे जरी दूर गेले असतील तरी जवळ येऊ शकतात. आम्ही आता विधीमंडळात एका गटात आलेले आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. हे काम करत असताना सर्वांनी एका दिशेने काम करणे महत्वाचे आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय केवळ उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. याबाबतीत मी निश्चितीच आशादायी आहे”, असे केसरकर म्हणाले.