टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले. आज (शुक्रवारी) सकाळी शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने ते तिथेच स्टेजवर कोसळले. बंदुकीच्या आवाजाने तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना निधन झाले, ते ६७ वयाचे होते.
शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडणाऱ्या तरुणाचे नाव यामागामी तेत्सुया असे असून तो ४१ वर्षांचा आहे. आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतरही हल्लेखोर तिथेच थांबून राहिला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागामी तेत्सुया हा सेल्फ डिफेंन्स फोर्समधील सदस्य म्हणून कार्यरत असून तो शूटर असल्याची माहिती समोर आली आहे.
शिंजो आबे यांनी २८ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. वैद्यकीय कारणास्तव आबे यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. राजीनामा देताना त्यांनी विनम्रपणे झुकून जपानी जनतेची माफी मागितली होती. शिंजो आबे हे दीर्घ काळासाठी जपानचे पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. आठ वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती.
भारतात राष्ट्रीय दुखवटा
शिंजो आबे यांच्या निधनामुळे देशात उद्या राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे. भारत आणि आबे यांचे खास नाते होते. ते पंतप्रधान असताना भारत आणि जपान यांचे संबंध अधिक मजबूत झाले. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गेल्याच वर्षी भारताने आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.