मुंबई : सत्ता गेल्यापासून शिवसेनेला दररोज धक्के बसत आहेत. काल ठाण्यात ६७ पैकी ६६ आणि नवी मुंबईत ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा देण्याचे जाहीर करून २४ तास होण्यापूर्वीच आता कल्याण डोंबिवलीमधील ५५ माजी नगरसेवकदेखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
यामुळे कल्याण डोंबिवलीत देखील सेनेला मोठे खिंडार पडले आहे. काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेना भाजपा युतीची सत्ता राहिली आहे. कल्याण हा सेनेचा तर डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे.