नैनिताल : उत्तराखंडच्या रामनगर येथे कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाताच्या वेळी कारमध्ये १० प्रवासी होते त्यापैकी एकाला जिवंत वाचवण्यात यश मिळाले आहे.
राज्यातील कुमांऊ रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक नीलेश आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी, नाल्यांचा प्रवाह अतिशय वेगात आहे. पंजाबहून निघालेली कार पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता ढेला नदीत वाहून गेली. या अपघातात कारमधील १० जणांपैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा वेगवान असल्याने अज्ञानामुळे ही दुर्घटना घडल्याचे डीआयजींनी सांगितले. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील डेहराडून, नैनिताल, बागेश्वर, पिथौरागढ, टिहरी, पौरी आणि चंपावत येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात मान्सूनने उत्तराखंडमध्ये धडक दिल्याने डोंगराळ राज्यात भूस्खलनाची चिंता वाढली आहे.अतिवृष्टीमुळे अतिसंवेदनशील भागात भूस्खलन, खडक पडणे, रस्त्यांवर ढिगारा, धूप आणि नदी नाल्यांमध्ये पाणी वाहत असल्याने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.