Friday, May 9, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

उद्धवसाहेब, चौकडीला बाजूला करा आम्ही तुमच्यासोबत

उद्धवसाहेब, चौकडीला बाजूला करा आम्ही तुमच्यासोबत

मुंबई : उद्धवसाहेब, चांडाळ चौकडीच शिवसेनेला संपवत आहे. वेळीच डोळे उघडा आणि या चांडाळ चौकडीला बाजूला करा. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, अशा प्रतिक्रीया शिंदे गटातील बंडखोर आमदार व्यक्त करत आहेत.


या चौकडीला बाजूला केले तरच शिवसेनेला भवितव्य आहे. 'उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही. आम्ही आता भाजप बरोबर आहोत. त्यामुळे त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल. आम्ही संवाद साधत असताना आम्हाला थेट साहेबांशी बोलायचे आहे. मधले आजुबाजूचे लोक बाहेर ठेवून संवाद साधावा ही अपेक्षा आहे' असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत चर्चेची अपेक्षा बोलून दाखवली.


शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. सर्व बंडखोर आमदार आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहेत. पण आता शिंदे गट मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्विकारला. यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली.


'ते खूप जवळचे समजतात स्वत:ला पण ते शरद पवार यांच्या खूप जवळचे आहेत. आम्ही पहिल्या दिवसांपासून साहेबांचे मन वळविण्याचे प्रयत्न करत होतो. राऊत यांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यातला मी नाही. साहेबांनी सुद्धा सांगावे मी कधी मंत्रिपदासाठी मी त्यांना मला मंत्री करा म्हटले आहे, असे म्हणत केसरकर यांनी राऊत यांच्यावर टीका केली.


'मी कधी उत्तर देत नाही. पण तुम्ही एका महिला खासदाराला पदावरून काढता. हा सर्व महिलांचा अपमान आहे. तुम्ही त्यांना पदावरून काढता मग त्यांच्याशी बोलता. याला अर्थ राहात नाही, असे म्हणत केसरकर यांनी खासदार भावना गवळी यांना लोकसभा गटनेतेपदावरून काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.


एकनाथ शिंदे यांनी ज्या क्षणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवसापासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. पण भारतीय परंपरा प्रमाणे त्यांनी पुजा करून त्यांनी आज त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात भेटण्याचा आनंद जसा आम्हाला झाला तसाच आनंद महाराष्ट्रातील लोकांना होईल, असा विश्वास आहे. त्यांच्या दालनामध्ये आनंद दिघे यांचा फोटो आहे. हा शिष्याने गुरुचा केलेला सन्मान आहे. आजवर सगळ्या विभुतींचे फोटो लागले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे ते गुरू आहेत. आज शिष्य मुख्यमंत्री झाला म्हणून त्यांनी आपल्या गुरुचा फोटो लावला आहे, असा खुलासा केसरकर यांनी केला.


लोकांनी रिक्षावाला म्हणून हिणवले पण त्या रिक्षावाल्याच्या व्यथा ही ते चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यांच्यासाठी एसटी स्टँडवर एक चेंबर करण्याचा विचार ते करत आहेत. काही अधिकाऱ्यांनी आमचे अभिनंदन केले कारण आम्ही जनतेच्या हितासाठी लढा दिला आहे. आता महाराष्ट्राचा विकास वेगात होईल, अशी त्यांची भावना आहे.


दरम्यान, आम्ही बंड नाही, उठाव केला. शिवसेनेचे अठरापैकी १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. आम्ही पुन्हा शिवसेना उभी करू, असे मत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे बुधवारी व्यक्त केले.


त्याआधी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनीही बुधवारी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत आदींवर जोरदार हल्ला चढवला. "या चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा. हे तडफडून मरतील," असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.


संजय शिरसाट म्हणाले, "एखाद्याचा राग समजू शकतो. पण ५० आमदार जातात तेव्हा त्याचे गांभीर्य समजून घेत नाहीत. आजही ते गर्वात आहेत, गेले तर गेले, असे म्हणून-म्हणून शिवसेना संपवण्याच्या मागे ही जी चांडाळ चौकडी लागली आहे ना, ती उद्धव साहेबांच्या लक्षात यायला हवी," असे माझे मत आहे. यावर, ही चांडाळ चौकडी जर बाजूला सरकली, तर तुम्ही परत उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? असे एका पत्रकाराने विचारले असता, "शिवसेना त्याच जोमाने उभी राहू शकते, केवळ चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा. हे तडफडून मरतील," असेही शिरसाट म्हणाले.


आम्ही गद्दार नाही उठाव केला आहे. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. आम्ही कधीही शिवसेनेच्या विरोधात बोलणार नाही, शिवसेना प्रमुखांच्या विरोधात तर नाहीच नाही. आमची ठाकरे कुटुंबातील कुणाच्याही विरोधात बोलायची इच्छा नाही. ते आम्हाला नेहमीच आदरणीय राहतील, असेही शिरसाट म्हणाले.


यावेळी शिरसाट यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. माझ्या मतदारसंघासाठी १ कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात ११ कोटींचा निधी मिळतो, हे कसे, असा सवालही संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नाही, रेकॉर्डवर आहे, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment