सिंधुदुर्ग : कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर एस एम हायस्कूल समोर रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या बॅरीकेटला दुचाकी आदळून गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यातील एकजण कणकवलीतील असून दुसरा चौके येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर एसएम हायस्कूल समोर मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीच्या अपघात दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही ब्रिजवर असणाऱ्या सिमेंटच्या बॅरिकेटला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात विराज विजय चौकेकर (वय29, चौके तालुका मालवण) व अमरेश विठ्ठल तेंडुलकर (वय 42 राहणार कणकवली) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करत अमरेश तेंडुलकर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, श्री पवार, श्री वानीवडेकर, श्री धुरी, श्री वागताकर, यांच्यासह पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेतली.
महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने या पुलावर खचलेल्या भागाच्या ठिकाणी सिमेंट बॅरिकेट लावून ठेवली आहेत. ही बॅरिकेट पावसाच्या वेळी रात्रीच्या सत्रात दिसत नसल्याने हा अपघात होत या दोघांना जीव गमावा लागला. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.