मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
श्री सत्यनारायणाची पुजा करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्रालयात प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारणार आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बाळसाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांच्याही प्रतिमा मुख्यमंत्री दालनात लावण्यात आल्या आहेत.
३० जूनला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.