
संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस कोसळतोय. कोकणात नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोकणातील अनेक सखल भागात पाणी पाणीच झाले आहे. या पावसाने पुन्हा एकदा गत वर्षीतील पुराची आठवण करून दिली आहे. एकीकडे पाऊस बरसत असतानाच गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. ‘राजकारणात कोणीही दीर्घ काळ कोणाचा मित्र नसतो व राजकारणात दिर्घ काळ कोणीही कोणाचा शत्रूही नसतो’ याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील जनता घेत आहे. विधिमंडळाच्या २ दिवसांतील सर्वच राजकीय नेत्यांची भाषणेही महाराष्ट्राने एेकली. राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्याने राजकीय समीकरणेच बदलली आहेत. मात्र तरीही विधिमंडळातील कोपरखळ्या आणि फटकेबाजीने राजकीय वातावरण हलकं झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून शिवसेनेत बंड का केलं गेलं? याचा उलगडा झाला.
दोन दिवसांच्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक विषय व अनेक गोष्टी जनतेसमोर आल्या. शिवसेनेचे फक्त १६ आमदार राहिले आहेत. या सर्व राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपदही राष्ट्रावादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीचे काही नुकसान झाले नाही. नुकसान झाले ते शिवसेनेचेच. महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीत कोकणातील आ. दीपक केसरकर, आ. उदय सामंत, आ. योगेश कदम, आ. भरतशेठ गोगावले आदी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला. राजापूरचे आ. राजन साळवी, आ. भास्कर जाधव, आ. वैभव नाईक यांनीही शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गेले असते; परंतु कोकणातील शिवसेनेचे हे आमदार शिवसेनेतच का थांबले? त्यांची शिवसेनेवर असलेली प्रचंड निष्ठा म्हणून ते बिलकुल थांबलेले नाहीत, तर त्यांच्या थांबण्यामागे राजकीय हिशोबीपणा आहे. आ. उदय सामंत, आ. दीपक केसरकर, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने तेथे आपण जाऊन आपणाला काहीच मिळणार नाही, याची शंभर टक्के खात्री असल्याने ‘निष्ठा’ दाखवायची संधी आहे. केवळ यासाठी हे आमदार शिवसेनेत थांबले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ज्यांचा राजकारणावर अभ्यास आहे, त्यांना या सर्वांची ना. एकनाथ शिंदे यांच्याशी कशी ‘जवळीक’ होती याचीही माहिती आहेच. यामुळे आम्ही शिवसेनेशीच ‘एकनिष्ठ’ असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न खरेतर कुणालाच पटणार नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. राजन साळवी यांचे तिकीट मातोश्रीतून रद्द झाले होते. त्यावेळी आ. राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात ना. एकनाथ शिंदे यांचीच भूमिका महत्त्वाचीच ठरली होती. आ. भास्कर जाधव तर शिवसेनेने आ. उदय सामंत यांना मंत्रीपद दिले आपणाला दिले नाही म्हणून कमालीचे रुसले होते. हेही कोकणसह महाराष्ट्राने पाहिले आहे. यामुळे कोकणातील जे आमदार शिवसेनेत थांबले ते फार निष्ठावान म्हणून थांबले आहेत, असं समजण्याचं काहीच कारण नाही. ते तिकडे जाऊ शकत नाहीत म्हणूनच थांबले आहेत.
महाराष्ट्रातील हे राजकीय बदल घडत असताना कोकणातील राजकारणही काहीसं ढवळून निघाले आहे. कोकणातील राजकीय समिकरणे कोणी कितीही मांडण्याचा जरी प्रयत्न केला असला तरीही केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्याभोवतीच हे राजकारण असेल. अनेक उलथापालथीतही कोकण हे नेहमीच राणेंची साथ करीत आले आहे. यावेळीही कोकणातील राजकारण हे राणेंभोवतीच असेल, यात शंका घेण्याचे कारण नाही. येणाऱ्या जि. प., पं. स. निवडणूक, नगरपालिकांच्या निवडणुका व लोकसभा निवडणूक या निवडणुकींमध्ये फार वेगळं चित्र पहायला मिळेल. विद्यमान शिवसेनेचे खा. विनायक राऊत हे २०१९ मध्ये भाजपच्या साथीने निवडून आले होते. यावेळी पूर्वीची एकसंघ शिवसेना नाही की भाजप नाही त्यामुळे कोकणातील खासदारही निवडून येणे आजच्या घडीला अवघड आहे. अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.
गाववाले विधानसभा अध्यक्ष
३ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवड झाली. या विधानसभा निवडणुकीत कोकणचे दोन सुपूत्र एक-दुसऱ्यासमोर उभे ठाकले होते. आ. राहुल नार्वेकर आणि आ. राजन साळवी अशी ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आ. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले. राहुल नार्वेकर हे सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे सुपूत्र आहेत. विधानसभा अध्यक्षपदी सिंधुदुर्गातील सुपूत्राला प्रथमच हा मान मिळाला आहे. यापूर्वी १९९५च्या शिवसेना-भाजप सत्तेच्या काळात दत्ताजी नलावडे विधानसभा अध्यक्ष होते. ना. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाने सिंधुदुर्गात एक मानाच पान मिळालं आहे.
[email protected]