कणकवली : एरव्ही राजकारणात नेहमी चर्चेत असणारे आणि राजकीय धुरळा उडून देणारे भाजपामधील आक्रमक आमदार नितेश राणे यांनी आज चक्क शेतात उतरून शेतीच्या कामाचा आनंद घेतला. बांधावर बसून इतर शेतकऱ्यांसोबत न्याहारी सुद्धा केली.
आमदार नितेश राणे हे आज सकाळी अचानक आपल्या कणकवली तालुक्यातील वरवडे या मूळ गावी असलेल्या शेतात दाखल झाले आणि शेतातल्या चिखलात रमले. राजकारणातील राणे शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याने वरवडे मधील शेतकऱ्यांना देखील एक अप्रूप वाटले. आतापर्यंत राजकारणात केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंच्या पावलावर पाऊल ठेवत आक्रमक राजकीय नेता म्हणून आमदार नितेश राणे यांची ओळख आहे. मात्र हेच राणे आज भात शेतीच्या मळ्यामध्ये लावणी करताना दिसले.
लावणी करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी पॉवर टिलर देखील आपल्या हाती घेतला. यातच पारंपरिक शेतीसाठी वापरल्या जाणारे बैलांचे जोत धरण्याचा कोणताही अनुभव नसताना देखील आमदार नितेश राणे यांनी बैलांची जोत ही हाकवले. तसेच प्रत्यक्ष शेतात उतरून लावणी देखील केली.
एवढेच काय तर जे शेतकरी या धावपळीच्या कामातून वेळ काढून शेतीच्या बांधावर बसून जशी न्याहारी करतात त्याच पद्धतीने आमदार नितेश राणे ज्या ठिकाणी शेतीत उतरले तेथे बांधावर बसून न्याहरीची चव देखील चाखली. यावेळी त्यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत हे देखील उपस्थित होते. इतर वेळी राजकारणात सक्रिय असणारे आमदार नितेश राणे मात्र आज भर पावसात वेळात वेळ काढून शेतीत रमल्याने सर्वांच्या दृष्टीने हा विषय औत्सुक्याचा व चर्चेचा बनला होता.