
कल्याण (वार्ताहर) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण पूर्व भागातील आडिवली-ढोकळी परिसरात ४०० घरांमध्ये पाणी शिरले. या भागात नाला नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. १.७५ कोटी रुपये निधी अरुंद नाल्याच्या कामासाठी मंजूर झाला आहे. नाल्याचे काम अद्याप झालेले नाही. लवकरात लवकर हे काम करण्यात यावे यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी देशमुख होम्समधील पाणीटंचाई संदर्भात ही चर्चा करण्यात आली.
आडिवली-ढोकळी हा परिसर २७ गावांमध्ये समाविष्ट होता. २७ गावांपैकी १८ गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने आडिवली-ढोकळी परिसर महापालिकेतून वगळण्यात आला. या परिसराचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आडिवली ढोकळी परिसरात ज्या नाल्यामुळे पाणी तुंबते आणि ते नागरिकांच्या घरात शिरते. या परिसरातील एक मोठा नाला अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी पाटील यांनी महापालिकेकडून निधीची मागणी केली होती.
महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी संदीप गायकर सभापती असताना त्या वेळी पाटील यांच्या मागणीनुसार महापालिकेने १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे. या भागात एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंतही बांधली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह खुंटला आहे.
ही संरक्षक भिंत नागरिकांच्या पुढाकाराने तोडण्यात आली होती. मात्र पावसाळा संपल्यावर पुन्हा त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. अतिवृष्टी आणि जोरदार मुसळधार पाऊस झाला की, नाल्यामुळे या भागातील चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागत आहे.