रत्नागिरी (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटामध्ये पुन्हा दरड कोसळल्याने या घाटातील वाहतूक येत्या १० जुलैपर्यंत बंद राहणार आहे. गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, नद्यांना पूर आले आहेत.
परशुराम घाटात २ जुलैला रात्री दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद झाला होता. त्यावेळी तातडीने दरड बाजूला करून पहाटे साडेतीन वाजता वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र त्यानंतरही पाऊस सुरूच होता. त्यामुळे ५ जुलै रोजी पुन्हा एकदा दरड खाली येऊन परशुराम घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आता ती १० जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून, घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे दरडी कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी ९ जुलैपर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा, असा अहवाल राष्ट्रीय महामार्गाच्या पेण आणि रत्नागिरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
त्यानुसार आज ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ९ जुलै रोजी रात्री २४ वाजेपर्यंत (१० जुलैची मध्यरात्र) परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेश चिपळूणचे उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण पवार यांनी दिले. ९ जुलै रोजी परशुराम घाटाची परिस्थिती पाहून व अतिवृष्टीचा विचार करून कार्यकारी अभियंत्यांचा पुन्हा अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.
या बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.