मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1544565626370306048
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गेल्या वर्षीच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची कोणतीही शाहनिशा न करता काही ऑनलाइन माध्यमांनी फोटोसह भेटीची बातमी दिली होती.
एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर आणि अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.'
https://twitter.com/NCPspeaks/status/1458788610346401794
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ११ नोव्हेंबर २०२१ ला शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भेटीची माहिती देण्यात आली होती. या भेटीचा फोटो आता व्हायरल केला जात असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.