जव्हार (वार्ताहर) : खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या धाडसामुळे दोन जुळ्या बालकांना जीवनदान मिळाले आहे. मोखाडा तालुक्यातील बोटोशी येथील ही घटना आहे.
तालुक्याच्या मुख्यालयापासून ३० ते ३५ किमी अंतरावर वसलेले बोटोशी (गावठा) येथील सीता वसंत दिवे या गरोदर मातेला रस्त्याची अवस्था बिकट असल्याने दवाखान्यात कसे पोहोचवायचे, असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी कुटुंबीयांकडून आटापिटा सुरू असताना मध्ये बराच कालावधी उलटल्याने एका बालकाला तिने घरीच जन्म दिला.
यानंतर खराब रस्त्याची वाट पार करत घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली; परंतु मुसळधार पावसामुळे दगडी मातीचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाल्यामुळे रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ करत वाहनचालक देवीदास पेहरे यांच्या धाडसामुळे व येथील गावकऱ्यांच्या सहकाऱ्यामुळे या गरोदर मातेला सुखरूप दवाखान्यात पोहोचवण्यात आले. या मातेने दुसऱ्या बाळालाही सुखरूप जन्म देऊन ते सध्या जव्हार कुटीर रुग्णलयात उपचार घेत आहे.
ही घटना भयानक असून वाहनचालक देवीदास पेहरे व आरोग्य विभागाच्या टीमचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
– प्रदीप वाघ, अध्यक्ष, (संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य)
रस्त्याची अवस्था बिकट असल्याने त्यातच मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णत: चिखलमय झाल्याने घटनास्थळी पोहोचणे जिकरीचे झाले होते; परंतु गावकऱ्यांनी मदत केल्याने या मातेला सुखरूप दवाखान्यात पोहोचवू शकलो. – देवीदास पेहरे (वाहनचालक)
अशा घटना वारंवार या उद्भवत आहेत. याकडे लक्ष देऊन येथील रस्त्याचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा. – तुकाराम पवार, (ग्रामस्थ)