प्राचीन भारताचा इतिहास दैदीप्यमान आहे. हिंदू संस्कृतीचे अनेक दाखले आजही दिसतात; परंतु या देशावर अनेक आक्रमणे झाल्यानंतर तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न मोघल राजवटीपासून सुरू झाला. अनेक शहरांची, ठिकाणांची नावे बदलण्यात आली. बाबरी मशीद आणि राम मंदिरांचा वाद अनेक वर्षे न्यायप्रविष्ट होता. अखेर पुरातत्त्व विभागाने सादर केलेले पुरावे आणि अन्य बाबींचे सखोल निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीचा मार्ग खुला केला होता. हा झाला धार्मिक मुद्दा; परंतु इतिहास बदलण्यासाठी अनेक नावे बदण्यात आली होती. महाराष्ट्रातही आपल्याला त्याची अनेक उदाहरणे देता येतील. ज्या औरंगजेबाने हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांना व मराठ्यांना त्रास दिला, त्यांच्या नावे असलेले औरंगाबाद शहराचे नाव बदलावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे केली जात होती. औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव देण्याचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुद्दा बनला होता. नव्या पिढीला बऱ्याच अंशी माहिती नसते. ते जे शहराचे नाव आहे, त्याचाच व्यवहारात उपयोग करत असतात. त्यातून विस्मृतीत गेलेल्या इतिहासातील काही दुष्ट राजवटीतील नावेही आपण सहजतेने स्वीकारतो. उत्तर प्रदेशात योगी सरकार सत्तेवर आल्यानंतर फैजाबादचे नाव अयोध्या केले, अलाहाबादचे नाव प्रयागराज केले. आता देशातील दक्षिणेत असलेल्या एका शहराच्या नावाच्या बदलाची सध्या जोरदार चर्चा आहे. ते शहर म्हणजे हैदराबाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हैदराबादचा उल्लेख ‘भाग्यनगर’ असा केल्यानंतर, भाग्यनगर हे नाव कसे अचानक कुठून आले? याची देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
२०१५ सालापर्यंत हैदराबाद हे अखंड आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर होते. सध्या हैदराबाद हे तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. मोत्यांचे शहर अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकलेचा वारसा असल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. शहरात १९९० नंतर शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली आहे. तसेच दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटनिर्मितीचे हैदराबाद हे अग्रगण्य केंद्र मानले जाते. येथील चारमिनार हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे, तर रामोजी फिल्म सिटी हे आकर्षणस्थळ आहे. तसेच शहरामध्ये बिर्ला मंदिर, गोलकोंडा किल्ला इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान मोदी जे बोलतात, तसे घडते. त्यामुळे येणाऱ्या काळात हैदराबादचे नाव हे भाग्यनगर होण्यास कोणता अडथळा येईल, असे वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाग्यनगरचा आवर्जून उल्लेख केला. निजामाचे संस्थान खालसा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्याला ‘एक भारत’ दिला होता, असे स्मरण केले. हैदराबाद हे भाग्यनगर आहे. ज्याचे आपल्या सर्वांसाठी महत्त्व आहे. सरदार पटेल यांनी अखंड भारताचा पाया घातला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तुष्टीकरण संपवून तृप्तीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. “आमची एकच विचारधारा आहे, नेशन फर्स्ट. आमचा एकच कार्यक्रम आहे, नेशन फर्स्ट.” असे सांगून मोदी यांनी दक्षिण भारतात ज्या राज्यात भाजपचा प्रभाव कमी आहे, तेथे अधिक लक्ष देणार असल्याचे संकेत दिले.
याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी हैदराबादला एखादा कार्यक्रम आयोजित केला जात असे, त्यावेळी भाग्यनगर असे म्हणत असत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबाद येथील २०२० साली प्रचारादरम्यान भाग्यनगर असाच उल्लेख केला होता. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास शहराचे नाव भाग्यनगर केले जाईल, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रचारासाठी हैद्राबादला गेले होते. त्यावेळी त्यांनी ४२९ वर्षे जुने असलेल्या भाग्यनगर मंदिराला भेट दिली होती. हे मंदिर हैदराबाद शहरातील चारमिनारला लागूनच आहे. मात्र भाग्यनगर या नावाला एमआयएमने जोरदार विरोध करण्यास सुरू केली आहे. “तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही,” असे म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे या नामकरणाच्या मुद्द्यांवरून हैदराबाद शहराचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा भाग्यलक्ष्मी मंदिराचा इतिहास-भूगोल आणि वर्तमानावरून चर्चा सुरू झाली आहे. हे मंदिर कधी आणि कसं अस्तित्त्वात आलं, याविषयीच्या अनेक दंतकथा आहेत; परंतु हैदराबादमध्ये अनेक जुन्या मंदिराचे शिलालेख आढळतात. त्यात भाग्यलक्ष्मी मंदिराचा उल्लेख आढळतो, असे इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजही येथील भाग्यलक्ष्मी देवीची मूर्ती इतिहासाची साक्ष देत आहे. या देवळाची स्थापना कधी झाली, त्यामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी करण्यात आली, याविषयी मात्र सध्या या शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या मंदिरावरूनच शहराचे नाव भाग्यनगर पडले, असा दावा भाजपने केला होता. लवकरच भाग्यनगरचे नाव नकाशावर यावे, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.