मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर येथील खदानीत दोन जण बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा अशी त्या दोघांची नावे आहेत. दरम्यान शेखरचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत अजयचा शोध लागला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार अजय जोगदंड आणि शेखर विश्वकर्मा हे दोघेही गोराईचे रहिवासी होते. ते दोघे जण त्यांच्या पाच मित्रांसोबत खदानीत पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते सातही जण बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी तातडीने याची माहिती दहिसर पोलिसांना दिली. थोड्या वेळात दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आले. या घटनेची माहिती समजताच परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हेही घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू करून पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. तर खदानीत बुडालेल्या अक्षय आणि शेखरचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान रात्री शेखरला बाहेर काढण्यात आले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर रात्री उशिरापर्यंत अक्षयचा शोध सुरू होता.