मुंबई : सततच्या पावसामुळे चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगराचा काही भाग आज सकाळी घरांवर कोसळला. घटनेबाबत माहिती मिळताच चेंबूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तत्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तिघेही जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास डोंगराचा काही भाग लागून असणाऱ्या घरांवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले आहे.
दरम्यान, कालही घाटकोपर येथे दरड कोसळली होती. मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले.
घाटकोपरमध्ये ज्यावेळी घरावर दरड कोसळली, त्यावेळी त्या घरात राहणारे संतोष उपाले आणि त्यांचं कुटुंब असे पाच जण घरात होते. अचानक आवाज झाला आणि दरडीसह एक मोठे झाड घरावर कोसळले. भयभीत होऊन संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन बाहेर पळाले. जीव वाचला, मात्र घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. झाड आणि दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.