अडीच वर्षांत भडकल्या असंतोषाच्या ज्वाला

Share

सुकृत खांडेकर

भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे राज्यात नवे सरकार स्थापन झाले आणि शिंदे-फडणवीस नव्या पर्वाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस यांची टिंगलटवाळी करणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नव्या सरकारने पहिल्या दिवसापासूनच झोप उडवली आहे. नवे सरकार येताच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मते मिळवून विजयी झाले. दुसऱ्याच दिवशी भाजप- शिंदे सरकारने बहुमताचा ठराव आणला आणि २८८ सदस्यांच्या सभागृहात पुन्हा १६४ मते मिळवून जिंकला. महाआघाडीला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १०७ मते मिळाली, तर बहुमताच्या ठरावाच्या वेळी ९९ मते पडली. याचा अर्थ अडीच वर्षे सत्तेवर असलेल्या महाआघाडीला मतांची शंभरीसुद्धा गाठता आली नाही. महाआघाडीकडे १७२ आमदारांचे संख्याबळ आहे, अशी गुर्मी बाळगणाऱ्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पितळ उघडे पडले. उद्धव ठाकरे पंचवीस मुख्यमंत्री राहतील, असे सांगणारे शिवसेनचे वाचाळवीर सत्तांतरानंतर तोंडावर आपटले.

सत्तांतरानंतर विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. या दोन दिवसांत महाआघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीचा पंचनामाच झाला. भाजपने आणि एकनाथ शिंदे समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीची पोलखोल केली. राज्याचा मुख्यमंत्री कसा नसावा, हेच त्यांच्या भाषणांचे सार होते. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंचाहत्तर मिनिटाचे भाषण म्हणजे चौफेर टोलेबाजी होती. गुलाबराव पाटील यांनीही त्यांना जोरदार साथ दिली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून शिवसेना नेतृत्वाच्या मर्मावर घाव घातले. गुलाबराव पाटील यांनी तर शिवसेनेचे नेतृत्व पक्षाच्या आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना कसे तुच्छ लेखायचे, हे उदाहरणासह सांगितले. विधानसभेत शिवसेनेचे छपन्नपैकी आता जेमतेम चौदा आमदार उरले आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून झालेल्या आक्रमक हल्ल्याला तोंड देण्यासाठी कुणीच शिल्लक नाही का? असे चित्र दिसले. शिवसेनेची बाजू लढविण्याची
वेळ भास्कर जाधव यांच्यावर आली. मातोश्रीवर तासनतास थांबून पक्षप्रमुख भेटले नव्हते म्हणून भास्कर जाधवांनी केलेला थयथयाट महाराष्ट्रातील जनता अजून विसरलेली नाही.

शिवसेनेचे ४० आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे १० अपक्ष आमदार अशा ५० आमदारांनी सेनेच्या नेतृत्वाविरुद्ध नाराजीचा झेंडा फडकवला, असे शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. ‘आम्ही बंड केले नाही, उठाव केला’, असे शिंदे गटाचे आमदार सांगत आहेत. ठाकरे सरकार अडीच वर्षे सत्तेवर होते, पण पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री असताना आमदारांना मान-सन्मान मिळत नव्हता. आमदारांचे फोन मुख्यमंत्र्यापर्यंत जातच नव्हते. वर्षा असो की मातोश्री, उद्धव यांच्या निवासस्थानी कधी कोणाला भेट मिळत नव्हती. स्वत: मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्याने खदखद वाढत होती. ५० आमदारांचे बंड हे काही एका रात्रीत घडलेले नाही. कोणी काही अमिष दाखवले म्हणून आमदार सूरत, गुवाहटी आणि पणजीला गेले नाहीत. पक्षनेतृत्वाच्या विरोधात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून असंतोष धगधगत होता. भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र. तीस वर्षांपासून सेना- भाजपने युती कायम ठेवली. मतभेद झाले, रूसवे- फुगवे झाले पण युती तुटली नव्हती.

ज्या शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राजकारण केले, त्या पक्षांबरोबर सरकार स्थापन करणे हे शिवसेनेतील बहुसंख्यांना पटले नव्हते. पक्षप्रमुख हे मुख्यमंत्रीपदाच्या मखरात मश्गूल असल्याने त्यांना पक्षातील असंतोषाची दखल घ्यावी, असे वाटलेच नाही. प्रत्येक आमदार चार ते पाच लाखांच्या मतदारसंघातून निवडून येतो, त्यांच्या मतदारसंघातील कामे व्हावीत ही त्यांची अपेक्षा असते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे वेगाने होत राहिली आणि दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांची सतत उपेक्षा होत राहिली. कोणत्या तोंडाने २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडे मते मागायची? असा प्रश्न सेनेच्या आमदारांना भेडसावू लागला. जयंत पाटील किंवा अजितदादा पवार जातात तेथे पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार जिंकणार, असा उघड प्रचार सुरू झाला. गेली अडीच वर्षे शिवसेनेच्या आमदारांना व पदाधिकाऱ्यांना कोणी वालीच नव्हते.

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्या मतदारसंघातील नगरपालिकेत आम्ही एक नंबर होतो, नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेना चार नंबरवर गेली’, असे सेनेच्या आमदारांनी सांगितल्यावर शिवसेनेची प्रतिष्ठा काय राहिली? पक्षातील धूसफूस ही उद्धव ठाकरे यांना ठाऊक नव्हती, असे मुळीच नाही. स्वत: आमदार प्रताप सरनाईक यांनी तर ठाकरे यांना पत्र लिहून चला आपण भाजपबरोबर जाऊया, असे म्हटले होते. पक्षाच्या वीस आमदारांचा गट जेव्हा उद्धव यांना भेटला व शिंदे काय म्हणतात, हे निदान ऐकून तरी घ्या, अशी विनवणी केली. त्यावर ‘तुम्ही पण जा…’ असा प्रतिसाद मिळाल्यावर एक तर स्वत:चे डोके आपटून गप्प बसायचे किंवा थेट बाहेर पडायचे, असा पर्याय या आमदारांच्यापुढे शिल्लक उरला.

एकीकडे अजितदादा पवार हे प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात, सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या भेटीगाठी सुरू होतात, मंत्रालयात सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांच्या मुलाखती असत, मग शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री असून जनतेला-लोकप्रतिनिधींना का टाळत होते? असा प्रश्न विचारला जात आहे. आजारी, शस्त्रक्रिया, कोरोना आदी कारणांमुळे राज्याचे प्रमुख अडीच वर्षे घरी होते. फेसबुक लाइव्हवरून फार तर एक-दोनदा कौतुक होईल. पण राज्याचे शकट हाकता येत नाही. प्रशासनावर पकड ठेवता येत नाही. चार- पाच वेळा निवडून आलेल्या आमदारांनाही पक्षात किमान मान मिळत नव्हता. आम्ही जणू उधारी मागायला आलो आहोत, अशी वागणूक पक्ष नेतृत्वाकडून मिळत होती, अशा व्यथा जाहीरपणे मांडल्या जात असतील, तर ते पक्षाला घातक आहे. नाराजीचा झेंडा फडकवून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार सांगत आहेत की, पक्षाच्या वतीने आम्हाला इतर कोणी भेटत नव्हते. एकटे एकनाथ शिंदे आमची विचारपूस करायचे व आम्हाला मदत करायचे… शिवसेनेच्या सर्व फलकांवर उद्धव यांच्या बरोबरीने आदित्य यांचे फोटो झळकत असतात. अडीच वर्षांत त्यांनी राज्याचे किती दौरे केले, किती भागात जाऊन प्रश्न सोडवले, जनतेशी व लोकप्रतिनिधींशी किती वेळा संवाद साधला? ते मुंबई उपनगराचे पालकमंत्री होते, आठवड्यातून दोन दिवस त्यांनी उपनगरासाठी द्यायला पाहिजे होता, पण तेही इतर कार्यक्रमात गुंतून राहिलेले असत. एकीकडे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, हसन मुश्रिफ, छगन भुजबळ राज्यात फिरत होते. देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार असे भाजपचे नेते सदैव जनतेत व कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसतात आणि दुसरीकडे शिवसेना भवनमध्ये शुकशुकाट दिसे.

महाआघाडीमुळे शिवसेना संपत चालली, ही भावना आमदारांत दृढ होत चालली. पक्षनेतृत्वाच्या भोवताली असलेल्या कोंडाळ्याने पक्ष संघटनेचे वाटोळे केले, हीच भावना आमदार बोलून दाखवत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर द्यायची व दुसरीकडे त्यांचे गटनेतेपद काढून घ्यायचे. एकीकडे परत या म्हणायचे, अजून वेळ गेली नाही सांगायचे व दुसरीकडे प्रेते, गटार, डुक्कर, वेश्या, रेडे अशी भाषा वापरायची… मग नेतृत्वावर विश्वास कोण ठेवणार? हिंदुत्व आम्ही सोडलेले नाही म्हणायचे आणि शिवसेनाप्रमुखांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसायचे. स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसविषयी मौन पाळायचे. यातूनच पक्षात असंतोषाच्या ज्वाला भडकत गेल्या, हेच विधानसभा अधिवेशनात दिसून आले.

sukritforyou@gmail.com

Recent Posts

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

47 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

52 minutes ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

60 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

2 hours ago