Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रकोकण‘बांदेकर, देसाई, सरदेसाई, परबांनी शिवसेना संपविली’

‘बांदेकर, देसाई, सरदेसाई, परबांनी शिवसेना संपविली’

आमदार नितेश राणेंची घणाघाती टीका

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांनाच अडचणीत आणण्याचे काम केले. नेहमी दिसणारा सहकारी भाचा वरुण देसाई आता १०-१५ दिवस कुठेच दिसत नाही. सध्या तो ‘मिस्टर इंडिया’ झाला असल्याची टीका नितेश राणे यांनी वरुण देसाई यांच्यावर केली आहे. नितेश राणे यांनी वरुण देसाई यांच्यावर टीका करताना शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांवर जोरदारपणे हल्ला चढवित या नेत्यांनीच शिवसेना संपवली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे आदेश बांदेकर, अनिल देसाई, वरूण सरदेसाई, अनिल परब हे नेते कधीही निवडून येत नाहीत, मात्र सेनेतील वरिष्ठ नेत्यांचे कान भरणे, लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याचे नाटक ही माणसे करत असल्यानेच शिवसेनेतून लोक जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर बोलताना सांगितले की, विनायक राऊत हे न्यायालयापेक्षा मोठे झाले आहेत का? त्यांनी उगाच भाजपवर आरोप करू नये. विनायक राऊत यांच्यासारखी लोक उद्धव व आदित्य ठाकरे यांच्या बाजूला असल्यामुळे आज त्यांची ही अवस्था झाली आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेनेच्या आजच्या स्थितीला विनायक राऊत यांच्यासारखे लोकच जबाबदार आहेत. रत्नागिरीत जाऊन ज्यांना तुम्ही गद्दार म्हणता, बंडखोर म्हणतात, त्यांच्याच पैशावर तुम्ही निवडून आला आहात. उदय सामंतांचे तुम्हाला पैसे चालतात, पण उदय सामंत आणि त्यांचे कुटुंबीय चालत नाहीत. तुमचे रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील कार्यालय त्यांच्याच पैशातून झाले आहे, तुम्हाला लाज असेल तर कार्यालय सोडा अशी जोरदार टीकाही विनायक राऊत यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार हे नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आले आहेत. हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेले आहेत. जे जे आता बोंबलत आहेत, ते ते सर्व खासदार भाजपमुळेच निवडून आल्याचेही त्यांनी सांगितले. जे जे सेनेचे खासदार आहेत आणि जे आमच्या राष्ट्रपती उमेदवारांना समर्थन देत आहेत. त्यांचे कौतुक करायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बंडखोरी केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून आमदार संजय राठोड यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्याविषयी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, उद्धव व आदित्य ठाकरेंवर कोणाचाच राग नाही. कोणाचाच आक्षेप नाही. आम्हाला प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र त्यांच्या अवती भोवती जे लोक आहेत, जे कधीही निवडून येत नाही मग ते आदेश बांदेकर, अनिल देसाई, वरूण सरदेसाई, अनिल परब असतील हे कधीही निवडून येत नाही आणि ही माणसे त्यांना मार्गदर्शन करतात. वरिष्ठांचे कान भरणारे हे लोक असल्यामुळेच संजय राठोड बोलत आहेत, आणि ते योग्यच बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार टिकणार नाही, या पवारांच्या व अन्य जणांच्या प्रतिक्रियेवर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, शरद पवार यांनी २५ वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार आहे, असेही सांगितले होते. मात्र स्वतःचे उरलेले आमदार कधी फुटतील याचा अंदाज त्यांना नाही त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी अशी वक्तव्ये करावी लागत आहेत. हे शिवसेना-भाजपा सरकार २५ -५० वर्षे महाराष्ट्रात दिसणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार संपर्कात असल्याचे संकेत आहेत. विश्वासदर्शक ठरवावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार उगाच उशिरा आलेले नाहीत. जबाबदार लोक आहेत, काही माजी मुख्यमंत्री आहेत, काही माजी मंत्री काही मंत्र्यांचे भाऊ आहेत. हे उगाच उशिरा पोचले नाहीत, दाल में कुछ काला है! असे म्हणत बहुमत चाचणीवेळी जे आमदार गैरहजर राहिले आहेत, त्यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढविला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -