Sunday, October 26, 2025
Happy Diwali

संपत्तीच्या वादातून अफगाण तरुणाची हत्या

संपत्तीच्या वादातून अफगाण तरुणाची हत्या

नाशिक (हिं.स.) : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात एका अफगाणी तरुणाची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ख्वाजा सय्यद जब चिस्ती असे त्याचे नाव असून तो मुळचा अफगाणीस्थानचा रहिवासी होता. ही हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याची माहिती नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, अफगाणी नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून त्यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिश्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

निर्वासित असल्यामुळे ते मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे संशयितांच्या नावाने गाडी आणि मालमत्ता खरेदी केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक या फरार संशयितांचा शोध घेत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment