मुरबाड (वार्ताहर) : मुरबाड -कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात कित्येक वर्षे रखडलेला स्काय वॉक अर्थात (काचेचा पुल) हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावणार, अशी माहिती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन किसन कथोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आघाडी सरकारच्या काळात रखडलेले मुरबाड तालुक्यातील सर्व प्रकल्प मी लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आता राज्यात भाजप युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे मला कोणत्याही कामासाठी निधी कमी पडणार नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळे लवकर लवकर जे काही रखडलेले प्रकल्प असतील ते मार्गी लागतील, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत किसन कथोरे यांनी दिली.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही मी माळशेज घाटातील स्काय वॉक प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिले नाही. परंतु आता शिवसेना भाजपचे सरकार असल्याने हा प्रकल्प लवकरच मार्गे लावण्यासाठी कालपासूनच पाठपुरावा सुरू केलेला आहे. मुरबाड रेल्वे हाही प्रकल्प मार्गी लागेल, यासह अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याची माहिती यावेळी आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पत्रकारांनी आमदार किसन कथोरे यांना विचारले की होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागेल का, याबाबत किसन कथोरे यांनी सूचक वक्तव्य केले की मंत्रीपद मिळेल ना मिळेल, याच्यापेक्षा मी आमदार आहे. तसेच राज्यात माझे सरकार आहे. त्याबद्दल मी जास्त खुश आहे. त्यामुळे निधी आणण्यासाठी मी कुठे कमी पडणार नाही, असे संकेत किसन कथोरे यांनी दिले आहे.