Thursday, October 30, 2025
Happy Diwali

देह हा देवाच्या प्राप्तीकरिता आहे

एकदा असे झाले, की एका साधूकडे चोरांनी चोरी केले. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चोरांना आणून, गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले, आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता? म्हणून शिष्यांनी गुरूला विचारले, तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की, "तुम्ही तरी काय करता? सर्वचजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत; कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून दिला; परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही! म्हणून, विषयात आसक्ति न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी 'मी भगवंताकरिता आहे' असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर, मग द्वैत आपोआप नाहिसे होऊन जी एकाग्रता साधते, तीच खरी समाधी होय.

संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास' अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात. ते सदासर्वदा समाधीसुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते-ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव-अंश होता, तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तीचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. ‘माझ्या देवाला हे आवडेल का?’ अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की, कुणाला आनंद पाहिजे असेल, तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे.

- ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Comments
Add Comment