Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशिंदे-फडणवीसांनी ‘विश्वासदर्शक’ जिंकला

शिंदे-फडणवीसांनी ‘विश्वासदर्शक’ जिंकला

विधान भवनात भाजप व शिंदे समर्थक आमदारांच्या गटाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर महाराष्ट्राला स्थिर सरकार प्राप्त झाले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड व त्यापाठोपाठ सोमवारी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. सदनातील १६४ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखविला. दोन्ही दिवस या सत्ताधाऱ्यांना समर्थनाची आकडेवारी तीच होती, पण विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीकडून रविवारी १०७, तर सोमवारी ९९ आमदारांनी मतदान केले. नव्या व्यवस्थेमध्ये मागील सरकारमध्ये असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्याने त्यांना सभागृहात शिस्त राखण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनपर भाषणात कोठेही टीकाटिप्पणी न करता परस्परांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केल्याने सभागृहात संघर्षाला नाही, तर विकासाला चालना मिळणार असल्याचे तूर्तास स्पष्ट झाले. अजित पवारांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला, तर मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांच्या कार्यप्रणालीची प्रशंसा करताना कोरोना काळात मंत्रालयात सर्वाधिक काळ बसून राज्याचा कारभार हाकल्याविषयी सभागृहात त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

देवेंद्र फडणवीसांचे भाषण नेहमीच अभ्यासू असते, त्यात मुद्देसूदपणा असतो, कोठेही फापटपसारा अथवा टीका-टोमणे या प्रकाराला थारा नसतो, हे सभागृहानेच नाही तर उभ्या महाराष्ट्राने पुन्हा एकवार जवळून पाहिले आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवू’ हा शब्द दिला होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना मोदींनी बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचा शब्द पूर्ण केला असल्याचा उल्लेख फडणवीसांनी सभागृहात आपल्या भाषणातून केला. ‘‘काही लोकांना असे वाटायचे की, आम्ही सत्तेसाठी काही हे सर्व करत आहोत. पण आमचा विचार सांगतो की, सत्ता हे आमचे साध्यच नाही, ते आमचे साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. आमचे सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेने काम करणार नाही. मागील सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करू.’’ या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे फडणवीस म्हणाले. ‘‘जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा तेव्हा एखाद्या चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ही निरंकुश सत्ता खाली आणावी लागते’’, असे म्हणत फडणवीसांनी सभागृहात महाविकास आघाडीला टोला लगावला. २० जूनपासून सुरू झालेला राज्यातील राजकारणातील अस्थिरतेचा खेळ २ दिवसांपूर्वीच संपुष्टात आला.

भाजपचे आमदार आणि शिंदे गटाकडे असणारे जवळपास ५० आमदार पाहता या सरकारकडे बहुमत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. विधानसभा अध्यक्ष निवड व विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणे ही औपचारिकता सभागृहात पूर्ण झाली. शिंदे समर्थक आमदारांनी आपल्या मनातील व्यथा स्पष्टपणे मांडताना आपल्याला कोणत्या प्रसंगातून जावे लागले, याचेही कथन केले. शिंदेसमर्थक आमदारांनी वेगळी भूमिका मांडल्यावर भाजपने सत्तेसाठी हे केले असल्याचा व भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, असा प्रचार सहा-सात दिवसांच्या काळात महाविकास आघाडीकडून जोरदारपणे करण्यात आला होता. तथापि, भाजपने शिंदे गटाला झुकते माप दिल्याने भाजप सत्तेसाठी स्वार्थी नसल्याचा संदेश भाजपने उक्तीतून नाही, तर कृतीतून दिल्याने महाविकास आघाडीला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आभाराच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवताना भाजपसाठी सत्ता महत्त्वाची नाही, तर हिंदुत्व महत्त्वाचे आहे, भाजप सत्तेच्या मागे नाही, तर हिंदुत्वाच्या मागे जाणारी असल्याचे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींदरम्यान पहावयास मिळाले. सभागृहातील भाषणांमध्ये राजकीय उखाळ्या-पाखाळ्या, शालजोडीतील टोमणे, विनोदी शैलीत विरोधकांचे वस्त्रहरण हे सर्व प्रकार ओघाने येतात. आजही सभागृहातील कारभारात ते पहावयास मिळाले. एकनाथ शिंदेंनी भाषणात सर्वांचेच आभार मानताना, आपण धर्मवीर आनंद दिघे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच घडलो असल्याचे व आजवर येथे आल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगितले. आजवरच्या वाटचालीत आपण केवळ शिवसैनिक म्हणूनच वावरल्याचे शिंदे यांनी सभागृहात सांगताना या वाटचालीमध्ये आपण संघटनेसाठी केलेली विविध आंदोलने, तुरुंगवारी याचाही आढावा घेतला. आपल्यासोबत असणाऱ्या आमदारांना आपण कोणत्याही प्रकारची आमिषे दिली नाही. कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही. सर्व एका विचाराने एकत्रित आले. हिंदुत्वाच्या भूमिकेपासून आपण लांब जात असल्याचे व नको त्या घटकांच्या सोबत सत्तेत असल्याने सर्वच आमदारांमध्ये एक प्रकारची घुसमट होत होती. त्यातून हा उद्रेक झाला आणि हिंदुत्वाची सातत्याने कास धरणाऱ्या भाजपसोबत जाण्याचा एकत्रित निर्णय आमदारांनी घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सहकाऱ्यांनी मंत्रीपदाचा त्याग करत तसेच इतर आमदारांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखविला, ही आपल्या आयुष्यातील कमाई असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपल्या मुलासाठी बुरुज उतरणाऱ्या शिवकालीन हिरकणीच्या गावासाठी २१ कोटींचा निधी मंजूर करताना इंधनावरील व्हॅट लवकरच कमी करणार असल्याचे सुतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले. विश्वासदर्शक ठराव जिंकला, आता महाराष्ट्राच्या जनतेला लोकल्याणकारी कामाची या सरकारकडून अपेक्षा आहे. स्पष्ट बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांना राज्यकारभार हाकताना फारशा अडचणी येणार नाहीत. एकीकडे उद्धवसेना खिळखिळी झालेली असल्याने भाजप व शिंदे समर्थक मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आक्रमक रणनीती आखण्याची चर्चा आताच विधान भवनात सुरू झाली आहे. ही चर्चा निश्चितच महाविकास आघाडीची झोप उडविणारी ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -