Monday, May 12, 2025

देश

नुपूर शर्मांवरील कोर्टाच्या ताशेऱ्यांवर १५ निवृत्त न्यायमूर्तींचा आक्षेप

नुपूर शर्मांवरील कोर्टाच्या ताशेऱ्यांवर १५ निवृत्त न्यायमूर्तींचा आक्षेप

नवी दिल्ली (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयातील न्या. सूर्यकांत आणि न्या. जे.बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने नुपूर शर्मांवर कठोर ताशेरे ओढले होते. या खंडपीठाचे ताशेरे आणि निरीक्षणावर ११७ दिग्गजांनी आक्षेप नोंदवला असून त्यात १५ निवृत्त न्यायमूर्तींचाही समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वतीने सुप्रीम कोर्टातील सर्व याचिका वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायलयाने त्यांची याचिका फेटाळून लावताना कठोर शब्दात खडसावले होते.


उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येसाठी नुपूरने पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेले वक्तव्य कारणीभूत असल्याचे न्यायालयाने म्हंटले होते. तसेच नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे देशभरात हिंसाचार भडकला. देशात जे काही घडत आहे त्याला एकटी नुपूर शर्मा जबाबदार असून त्यांनी संपूर्ण देशाची टीव्हीवर येऊन माफी मागावी, असे न्यायलयाने मौखीक टिप्पणीत म्हटले होते.


या विरोधात आता देशातील ११७ सेलिब्रेटींनी खुले पत्र प्रसिद्ध करून सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे. या सेलिब्रेटींमध्ये १५ निवृत्त न्यायाधीश, ७७ निवृत्त नोकरशहा आणि २५ निवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी अशा एकूण ११७ जणांचा समावेश आहे.


या सर्वांनी स्वाक्षरी करून जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याऐवजी, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्यास भाग पाडले आणि योग्य मंचाकडे (उच्च न्यायालय) जाण्यास सांगितले. तेही सुनावणी दुसऱीकडे पाठविण्याचे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसताना असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment