Friday, October 24, 2025
Happy Diwali

पावसाळ्यातही एसी लोकलला प्रवाशांची पसंती

पावसाळ्यातही एसी लोकलला प्रवाशांची पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सुरुवातीला एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अल्प होती, पण रेल्वे प्रशासनाने तिकीट दरात कपातीचा निर्णय घेतल्यानंतर एसी लोकलच्या तिकीट आणि पास विक्रीत वाढ होऊ लागली आहे. पावसाने जोर धरला असतानाही जून महिन्यात एसी लोकलने प्रवाशांनी सर्वाधिक प्रवास केला आहे.

प्रवासी वर्गाचे असे मत आहे की, एसी लोकलमधून प्रवास करताना पावसापासून संरक्षण मिळते. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण तिकीट विक्री दोन लाखांपार गेली असून मध्य रेल्वेवर जूनमध्ये एकूण २ लाख ९ हजार ३९५ आणि पश्चिम रेल्वेवर दोन लाख ३८ हजार २७४ तिकीटांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार मार्गावर वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. सुरुवातीपासून या सेवांना अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे तिकीट दरात कपात करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती.

अखेर ५ मेपासून तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. वाढलेला उकाडा आणि तिकीट दरातील कपात यामुळे मे महिन्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. मध्य रेल्वेवर मे मध्ये एकूण १ लाख ८४ हजार ७९९ तिकीटांची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वेवर १ लाख ९६ हजार ९३८ तिकीटे विकली गेली. मध्य रेल्वेवर जूनमध्ये एकूण २ लाख ९ हजार ३९६, तर पश्चिम रेल्वेवर २ लाख ३८ हजार २७४ तिकिटांची विक्री झाली आहे.

Comments
Add Comment