चंद्रपूर (हिं.स.) : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बांबुपासून तयार करण्यात आलेला तिरंगा ध्वज भेट देत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
राज्यातील दीन, दुर्बल, शोषित, पिडीत, उपेक्षित, वंचित जनतेच्या समस्या मार्गी लावत राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी आपणास बळ लाभावे अशी प्रार्थना श्री सिध्दीविनायकाचरणी करत असल्याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार घेवून महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी निघालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण सर्वशक्तीनिशी असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत चंद्रपूर जिल्हयातील विविध समस्या व प्रश्नांबाबत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबत लवकरच आढावा घेत हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.