Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीमुसळधार पावसामुळे मुंबई जलमय

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय

वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत

मुंबई : मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई महापालिकेने पाणी न साचण्याचा दावा केला असला तरी हा दावा फोल ठरला असून मुंबई आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोडी झाल्याचे चित्र आहे. तर लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

धारावी कलानगर रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे.

गोरेगाव ते गुंदवली या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी आहे. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. कुर्ला हायवे जंक्शन रस्ता, चेंबूर स्टेशन परिसर, चेंबूर सब वे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. काही भागात पाणी शिरल्याने रहिवाशाचे हाल झाले.

चेंबूर-सांताक्रुज जोडरस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. चेंबूरमधील शेल कॉलनी, पोस्टल कॉलनी, चेंबूर कॅम्प, भक्ती भवन, पी. एल. लोखंडे मार्ग, घाटकोपरमधील पंत नगर, गारोडिया नगर, घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम, भांडूपमधील कोकण नगर, मानखुर्दमधील रेल्वे स्थानक परिसर, चुनाभट्टी येथील रेल्वे स्थानक परिसर, स्वदेशी मिल परिसर आणि कुर्ल्यातील नेहरू नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत. मात्र कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत होता.

दरम्यान, हिंदमातामध्ये आज सकाळी पाणी न साचल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही.

घाटकोपरमध्ये घरावर दरड कोसळली, जीवितहानी नाही

घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरात पाचजण होते. दरडीच्या भागासह एक झाड घरावर कोसळले. या घटनेनंतर घरातले संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले.

बेस्टच्या वाहतूक मार्गात बदल

पावसामुळे पाणी साचल्याने बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. बस क्रमांक ३५७, ३६०, ३५५ (मर्यादित) या बसेस चेंबूर शेल कॉलनी येथून डॉ. आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत.

बस क्र ४, ३३, २४१, ८४ यांचे मार्ग नॅशनल कॉलेज येथून लिंकिंग रोडमार्गे, बस क्र २२, २५, ३०३, ३०२, ७, ३८५ यांचे मार्ग शितल टॉकीज येथून एसएलआर उड्डाणपूलमार्गे, बस क्र ३११, ३२२, ३३०, ५१७ यांचे मार्ग एअर इंडिया कॉलनी येथून एससीएलआर उड्डाणपूलमार्गे तर, सायन रोड क्रमांक २४ येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

तर काही मार्गावरील बस अन्य मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -