मुंबई (प्रतिनिधी) : रविवारीच्या ५६ चा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नुसार मुंबईतील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘समाधानकारक’ श्रेणीत आला आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) च्या आकडेवारीनुसार शुक्रवारी शहराचा एक्युआय १० होता. जो २०१५ मध्ये देखरेख सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.
सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, मुंबईचा एक्युआय पुढील दोन दिवस ‘समाधानकारक’ श्रेणीत राहील. तथापि, रविवारी शहराने जूनच्या मध्यानंतर प्रथमच ५० एअर क्वालिटी इंडेक्सचा टप्पा ओलांडला.
रविवारी एक्युआय वाढण्याचे कारण स्पष्ट करताना, सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या प्रकल्प संचालक गुफ्रान बेग म्हणाले की, “विशिष्ट क्षेत्राच्या एक्युआय वर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. परंतु, वाऱ्याचा वेग हा मुख्य घटकांपैकी एक आहे; विशेषतः मुंबईसारख्या भौगोलिक प्रदेशासाठी जो तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. मुंबईसाठी एक्युआय मधील वाढ आणि घट हे मुख्यत्वे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते जे शुक्रवारी जास्त होते आणि रविवारी कमी होते. परिणामी संपूर्ण शहरात हवेच्या गुणवत्तेत वाढ आणि घट होते, असेही ते म्हणाले.