Thursday, July 3, 2025

खासगी वाहनांसाठी चिखलदऱ्यातील जंगल सफारी बंद

खासगी वाहनांसाठी चिखलदऱ्यातील जंगल सफारी बंद

अमरावती (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यामधील चिखलदारा येथील जंगल सफारी खाजगी वाहनांकरिता बंद झाल्याने अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा विदर्भाचे नंदनवन, पर्यटन स्थळ व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी निसर्गरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी व आनंद लुटण्यासाठी रिमझिम पावसात रविवारी व शनिवारी या निमित्ताने चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटक मेळघाट परिसरात येत असतात.


या पर्यटकांकरिता स्थानिक चिखलदरा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या खाजगी वाहनाने जंगल सफारी घडवित असतात. परंतु पावसाळा सुरू होताच वनविभागाने जिप्सी चालकांना वाहने बंद करावी, असे सुचित केल्यामुळे अनेक जिप्सी चालकांवर आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरवर्षी जिप्सी चालक शासनाकडे जिप्सी चालविण्यासाठी निवेदन वनविभागाकडे देत असतात. चिखलदरा येथे नव्याने रुजू झालेले सुमंत सोळंके यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशावरून जिप्सीवर बंदी आणली. त्याच अनुषंगाने जिप्सी संघटनेचे अध्यक्ष इबू शहा व शिवसेना पदाधिका-यांनी जंगल सफारी बंद करू नये, या मागणीचे निवेदन वरिष्ठ वनाधिका-यांना दिले आहे.


जन आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेकडून देण्यात आला आहे. जिप्सी चालकांसोबत जंगलाची माहिती देणारे गाईड व इतर सुशिक्षित बेरोजगारांचाही यात समावेश होता. १५० नागरिकांचे कुटुंब उपाशी राहू नये म्हणून जंगल सफारीला परवानगी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाची आहे. निवेदन देताना शिवसेना संपर्कप्रमुख राहुल वैद्य, टिल्लू तिवारी, मेळघाट विधानसभा प्रमुख व शिवसेना तालुका अध्यक्ष साधुराम पाटील, इबु शहा, पत्रकार मोसिन शेख, नरेश तायवाडे, अनिल तायडे, शेख सजीद, चेतन जवंजाळ आदींची उपस्थिती होती.

Comments
Add Comment