Monday, August 25, 2025

सीएसएमटी येथे 'स्लीपिंग पॉड्स'ची सुविधा

सीएसएमटी येथे 'स्लीपिंग पॉड्स'ची सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येथे पॉड हॉटेल सुरू करण्यात आले आहे. काही तासांच्या आरामासाठी प्रवाशांना खासगी हॉटेल बुक करणे महागाचे ठरते. याचा विचार करून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या मुख्य मार्गावरील प्रतीक्षालयाजवळ प्रवाशांना अधिक आरामदायी, परवडणारा आणि स्वस्तात राहण्याचा पर्याय देण्यासाठी स्लीपिंग पॉड्सची सुविधा करण्यात आली आहे.

यामध्ये एकूण ४० पॉड्स आहेत. ज्यात ३० सिंगल पॉड्स, ६ दुहेरी पॉड्स आणि ४ फॅमिली पॉड्स आहेत. या उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेलमध्ये संपूर्ण गोपनीयता, मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम या सुविधा आहेत. या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोड (रिसेप्शनवर) आणि मोबाइल ॲपवर ऑनलाइन मोडद्वारे केले जाऊ शकते.

ज्या प्रवाशांना टर्मिनसजवळच राहायचे आहे, अशांना आरामदायी मुक्कामासाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता रेल्वेने नुकतीच १३१.६१ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना अधिक आराम देण्यासाठी हायब्रिड ऑन बोर्ड हाउसिंग सर्विस कॉन्ट्रॅक्ट्स, डिजिलॉकर्स, पर्सनल केअर सेंटर्स, ई-बाईक, ई-चार्जिंग पॉइंट्स, कंटेंट ऑन डिमांड, कॉन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह इत्यादी विविध नॉन-फेअर रेव्हेन्यू संकल्पना सुरू करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment