Thursday, October 30, 2025
Happy Diwali

वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या

वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या

हुबळी : सरल वास्तू फेम गुरुजी चंद्रशेखर अंगडी यांची मंगळवारी भरदिवसा हत्या करण्यात आली. ते हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये थांबले होते. येथे आलेल्या दोन अनोळखी लोकांनी चाकूने भोसकून त्यांचा खून केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अंगडी यांना किम्स रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, बागलकोट येथील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर यांनी कंत्राटदार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यांना मुंबईत नोकरी लागली आणि तिथेच स्थायिक झाले. पुढे त्यांनी तिथे वास्तू व्यवसाय सुरू केला होता.

हॉटेलच्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की चंद्रशेखर अंगडी हॉटेलच्या रिसेप्शनवर आले आणि खुर्चीत बसले. तेवढ्यात तिथे आधीच असलेले दोन तरुण त्यांच्याजवळ आले. एक त्यांच्या डाव्या बाजूला उभा राहिला आणि दुसरा समोरून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पायाला स्पर्श करू लागला. चंद्रशेखर यांनी त्याला उभे करताच शेजारी उभ्या असलेल्या मुलाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. ते स्वत:ला सांभाळतील तोपर्यंत त्यांच्या पायाला हात लावणाऱ्या तरुणानेही त्यांच्यावर चाकू हल्ला सुरु केला.

चंद्रशेखर यांनी स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते खाली पडले. त्यानंतर दोन्ही तरुणांनी त्यांच्यावर चाकूचे अनेक वार केले. त्यांच्या हत्येनंतर दोन्ही तरुण आरामात हॉटेलमधून निघून गेले. यादरम्यान हॉटेलमध्ये उपस्थित असलेले इतर लोक आणि कर्मचारी हा सर्व प्रकार पाहत होते. मात्र त्यांना वाचवण्याऐवजी लोक घाबरून पळून गेले.

पोलिसांनी सांगितले की, ३ दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एका मुलाचा हुबळी येथे मृत्यू झाला होता, त्यामुळे ते हुबळीला गेले होते. घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपासाचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे व्हिडिओ पाहून सर्व काही स्पष्ट होते. मी पोलिस आयुक्त लाभू राम यांच्याशी बोललो आहे. पोलिस मारेकऱ्यांना पकडण्यात व्यस्त आहेत. हा गुन्हा करणाऱ्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल.

Comments
Add Comment