मुंबई : आम्ही बंड नाही तर उठाव केला. आम्ही शिवसेना सोडली नाही. आमची चिंता नको, असे म्हणत बंडखोर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.
चार लोकांच्या टोळक्याने उद्धव ठाकरेंना वहावत नेले. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहेत त्यांना दूर करा. याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवे होते. ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात, असा थेट टोला पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.
आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा नाही. सर्व आमदार साहेबांना होत असलेला त्रास सांगण्यासाठी जात होते, पण चहापेक्षा किटली गरम. आमचे फोनही घेतले जात नव्हते, अशी खंत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, हिंदुत्त्वाचे संरक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. १९९० मध्ये भाजपसोबत पहिल्यांदा शिवसेनेने युती केली. मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरू केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल, असे वाटलेही नव्हते. जे मिळाले ते बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मिळाले. आज आम्हाला बंडखोर म्हटले जाते आहे. आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. मला पुन्हा टपरीवर पाठवण्याची भाषा करण्यात आली. टपरीवाला म्हणून मला हिणवले. पण, लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे.
गुलाबराव पुढे म्हणाले की, आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाही. भगवा हातात घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्हाला मंत्री केले हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता करण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचे पाणी, प्रेते अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो. एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले असे बोलण्यात आले. अहो त्यांचे चरित्र वाचा. त्यांची दोन मुले गेली तेव्हा दिघे साहेबांनी त्यांना अनाथांचा नाथ हो सांगितले होते. आज बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. याचा विचार कोणी करायचा. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. पण कोणी फोन उचलायचा नाही. अजित पवार सकाळी सहा वाजता यायचे, त्यांचा हेवा वाटायचा. एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते. शरद पवारांसारखी व्यक्ती तीन वेळा जळगावमध्ये आले, अजित पवार, जयंत पाटील सगळे गेले पण मग आमचं दु:ख काय ते समजून घ्या. मोदींनी ५० आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे पाटील म्हणाले.