मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र जून महिन्याच्या शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांतील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठ्यात गेल्या ५ दिवसांत साधारण ३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पाच दिवसांत वाढलेला पाणीसाठा हा बारा दिवस पुरेल एवढा आहे. धरणांमध्ये ४६,३०४ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असून असाच पाऊस झाल्यास मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट लवकरच टळेल.
सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे १० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. त्यावेळी केवळ १० टक्के पाणी साठा शिल्लक होता. मात्र गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान एका वर्षाला मुंबईकरांना १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. एका दिवसाकरीता मुंबईला ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. आज मितीस मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १९३३१० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
२९ जूनला धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या ५ दिवसांत सुरू असलेल्या पावसामुळे या धरणांमध्ये १ लाख ९३ हजार ३१० दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ५० दिवस पुरेल इतका आहे. जर पाऊस असाच पडत राहीला तर मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता करावी लागणार नाही.