Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीअदृश्य हातांचेही आभार

अदृश्य हातांचेही आभार

विश्वासदर्शक ठराव जिंकताच फडणवीसांचा काँग्रेसला टोला?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचे आणि अदृश्यपणे मदत केली, त्यांचेही आभार, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बहुमत चाचणीवेळी १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी भाजप आणि शिंदेसेनेतील सर्व आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावाचे भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या निष्ठेचे तसेच त्यांच्या संघटनकौशल्याचे आणि जनतेप्रती सेवाव्रती असण्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यासोबतच उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना ज्यांनी ज्यांनी टोमणे मारले, त्या सर्वांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे विजय वडट्टीवार, आणि चव्हाण यांचे नाव उच्चारले… ते म्हणाले, वडेट्टीवार साहेब, चव्हाण साहेब.. आभार तर मानलेच पाहिजेत..’ एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असे उघड दिसतेच आहे. मात्र अजूनही काही अदृश्य शक्तींचा या कारस्थानात सहभाग आहे. यात काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हा टोला काँग्रेसला होता की काय, अशी चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणात एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाल, ‘एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन आहे. २४X७ काम करणारा हा नेता आहे. निवडणूक असते, क्राईसिस असतो तेव्हा ७२X२१ असे तिहेरी वेळा काम करताना हा नेता दिसतो. एकनाथ शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. सगळ्यांसाठी धावून जाणे, ही शिकवण धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली. ज्याचा कुणी नाही, त्याचे दिघे साहेब होते. याच शिकवणीमुळे सामान्य माणसासाठी काम करताना शिंदेसाहेब दिसतात.’

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होता आले नाही. त्यानंतर त्यांच्या मी पुन्हा येईन.. या वाक्यावरून नेहमीच टिंगल उडवली गेली. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो… ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -