Wednesday, July 17, 2024
Homeमहत्वाची बातमी“शेअर्स मंदीत, पण सोने आले तेजीत”

“शेअर्स मंदीत, पण सोने आले तेजीत”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात पुन्हा एकदा घसरण पहावयास मिळाली. निर्देशांक निफ्टीने या आठवड्यात १५९२७ हा उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक काही काळासाठी रेंज बाऊंड राहू शकतात. अल्पमुदतीच्या चार्टनुसार १५१८० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जर ही पातळी तुटली, तर निफ्टीमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते. पुढील आठवड्यासाठी मात्र १५५०० या पातळीकडे लक्ष ठेवून व्यवहार करणे आवश्यक आहे. निफ्टी १६५०० ते १५५०० या पातळीत काही काळ वेळ घालवू शकतात. त्यामुळे १६५००च्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये मोठी तेजी येणार नाही. आपण आपल्या १३ जूनच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, दीर्घमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक यापूर्वीच मोठ्या मंदीचे संकेत देत असून जर दीर्घमुदतीच्या चार्टनुसार १५६७० पातळी तुटली, तर मात्र निफ्टीमध्ये ८०० ते १००० अंकांची मोठी घसरण होऊ शकते, असे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर केवळ २ आठवड्यांत निफ्टीमध्ये ५०० अंकांची घसरण झालेली आहे. १५६७० ही पातळी तुटल्यानंतर निफ्टीने १५१८३ हा निच्चांक नोंदविला.

जागतिक पातळीवर वाढत असलेले खनिज तेलाचे भाव, परकीय गुंतवणुकीचे होत असलेले निर्गमन याचा परिणाम या आठवड्यात रुपयावरदेखील दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने या आठवड्यात ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली. सध्या वाढत असलेले कच्चे तेल ही शेअर बाजाराच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. यातच घाऊक महागाई दराचे आकडे मागील महिन्यात आले. त्यानुसार महागाई दराने १७ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली. खनिज तेल, अन्नधान्य, इंधन, नैसर्गिक वायू इत्यादी किमती मागील वर्षाच्या तुलनेत खूप जास्त वाढलेल्या आहेत. तसेच भारतात व्याजदरासाठी महत्त्वाचा असणारा किरकोळ महागाई निर्देशांकही वाढलेला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी मागील महिन्यात रेपोदरात वाढ केलेली आहे. देश-विदेशात सुरू असणाऱ्या प्रतिकूल घटना, वाढत असलेले कच्चे तेल अमेरिकेतील बँकेकडून केलेली व्याजदर वाढ, यात सुरू असलेली विदेशी गुंतवणूकदारांची विक्री या सर्व घटकांचा परिणाम म्हणून रुपयामधील घसरण सुरूच आहे.

आपण मागील लेखातच सांगितल्याप्रमाणे, महागाईचा भडका आणि व्याजदरात होत असलेली वाढ यातून पुढील काळात अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे. सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा आणि गती मंदीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसिस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार बजाज टेलिफिल्म्स, टेस्टी बाइट, ग्रासिम, जागरण प्रकाशन यांसह अनेक शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची आहे.

आपण १३ जूनच्या लेखात सांगितल्याप्रमाणे शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर “श्रीसिमेंट” या शेअरने २०११३ ही पातळी तोडत मंदी सांगणारी रचना तयार केलेली असून आज १९१७८ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे, हे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर या शेअरने १७८६५ हा निच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पहावयाचे झाल्यास आपण सांगितलेल्या पातळीपासून जवळपास ७ टक्क्यांची घसरण दाखविलेली आहे. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७९६६ या पातळीच्यावर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. गेले काही दिवस सोने हे रेंज बाऊंड होते. मात्र या आठवड्यात सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ५१७९७ ही पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०१०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये सोने २००० ते २५०० रुपयांची घसघशीत वाढ दाखवू शकते. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा आता तेजीची झालेली असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५०४०० या पातळीच्यावर आहे, तोपर्यंत सोन्यात घसरण होणार नाही. निर्देशांकानी मोठ्या मंदीचे संकेत दिलेले असल्यामुळे पुढील काळात शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत.

पुढील काळात निर्देशांकात होणाऱ्या घसरणीत दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली, तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्याशेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे, म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही.

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -