सिंधुदुर्ग (हिं.स.) : आंबोली येथील हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. आंबोली दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी आपल्या जीवावर बेतून महिलेला वाचविले. ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास गेळे-कावळेसाद जाणाऱ्या रस्त्यावर घडली. जान्हवी शिंदे (२९) रा.कणकवली, असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते यांनी दिली.
कणकवलीतील हि विवाहिता आपला पती आणि मुलासह आंबोलीत फिरायला आली होती. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन ती पुराच्या पाण्यात कोसळली. पुराच्या पाण्यात वाहून जात असताना सदर महिलेने प्रसंगावधान दाखवित नदीतील झाडीला पकडले. त्यानंतर त्यांच्या पतीने ११८ नंबर वर फोन करुन पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस कर्मचारी दत्ता देसाई यांनी आपला जीव धोक्यात घालत दोरखंडाच्या सहाय्याने त्या महिलेला बाहेर काढले. पोलीस कर्मचारी अभिजित कावळे, संभाजी पाटील, अमित गोते आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. शिंदे कुटुंबियांनी पोलीसांच्या कार्यतत्परतेबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.