मुंबई : प्रेम मिळवण्यासाठीची धडपड ठेच या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कॉलेज जीवनातल्या प्रेमाची गोष्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.
आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे. ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे. नव्या दमाचे कलाकार, दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. टीजर आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.