मातोश्री निवास्थानी अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला असता, तर हे सरकार शानदारपणे आले असते. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, तर तो ठरलेल्या दिवशी पायउतार होईल, असे लिहून दिले असते. अगदी त्या पत्राचे होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारात लावा, असेही भाजपला सांगितले होते. पण त्यानंतरही त्यांनी पाठीत सुरा खुपसला, याचे दु:ख होते. आता अडीच वर्षे झाली आहेत म्हणजे पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नसणार आहे”, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर, असे म्हणणे म्हणजे त्यांचे निव्वळ रडगाणे आहे.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकारचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, असे कोण सतत सांगत होते? आता महाआघाडी सरकार व ठाकरे हेच पंचवीस वर्षे सत्तेवर राहणार, असा कोण जप ओढत होते? त्यांचे सरकार भाजपने पाडलेले नाही. त्यांच्याच पक्षातील त्यांना झालेल्या विरोधामुळे ते पडले आहे. त्यांची पक्षावरची पकड सुटली म्हणून सरकार कोसळले आहे. काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणखी राहण्यासाठी शिवसेनेबरोबर महाआघाडी सरकार चालवायचे होते. ते काही शिवसेना व उद्धव यांच्या प्रेमापोटी सेनेला बरोबर घेत नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत सदैव ज्यांच्याविरोधात लढा दिला, त्या काँग्रेस व राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार चालवावे, अशी दुर्बुद्धी ठाकरे यांना झालीच कशी? महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यास महाराष्ट्रातील जनतेने २०१९ मध्ये मुळीच जनादेश दिलेला नव्हता. ठाकरे यांनी जनादेश झिडकारून भाजपला दूर ठेवून स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी शरद पवारांची ऑफर स्वीकारली आणि शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली. ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून उतरल्यावर त्यांना आता मुख्यमंत्रीपदाची किंमत काय असते ते समजू लागले असावे, म्हणूनच ते भाजपबरोबर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी समझौता झाल्याचे भासवत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला होता, असे स्वत: ठाकरेच म्हणत आहे. असा निवडणुकीपूर्वी ठाकरे यांना भाजपने किंवा स्वत: अमित शहा यांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता, असे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले होते. तरीही ठाकरे यांचे भाजपने आपल्याला शब्द दिल्याचे टुमणे चालूच आहे. स्वत: अमित शहा यांनी पुण्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेला किंवा ठाकरे यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नव्हता, असे स्पष्टपणे काही महिन्यांपूर्वीच सांगितले. त्याचा विसर ठाकरे यांना पडलेला असावा. आम्ही कोणतेही आश्वासन चार भिंतीत देत नाही, जो काही शब्द देतो तो उघडपणे देतो, असे अमितभाईंनी ठणकावून सांगितले होते, तरीही सत्ता गमावल्यानंतर भाजपने आम्हाला शब्द दिला होता, असे ठाकरे का बरे सांगत आहेत?
भाजपचा मुख्यमंत्री आता पाच वर्षे नसणार, असे सांगताना त्यांना वाईट वाटते की भाजपच्या प्रेमापोटी ते असे बोलत आहेत? भाजपविषयी एवढी त्यांना आपुलकी वाटते, मग त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाआघाडी स्थापन करून सरकारचे नेतृत्व का स्वीकारले? त्यांनी म्हणजे भाजपने पाठीत सुरा खुपसला, अशी भाषा वापरणे हे उद्धव ठाकरे यांना मुळीच शोभत नाही. तीस वर्षांची नैसर्गिक मैत्री असलेल्या भाजपशी कोणी फारकत घेतली व कोणी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सौदेबाजी केली, हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. नऊ मंत्र्यांसह चाळीस आमदारांनी बंडाचा झेंडा का फडकवला?, त्यांच्यावर सूरत व गुवाहाटीला जाण्याची पाळी का आली?, कोणी आणली, कशामुळे आली? याची उत्तरे शोधण्यासाठी आत्मचिंतन करण्याऐवजी ठाकरे भाजपने पाठीत सुरा खुपसला असा आरोप करीत आहेत, हे हास्यास्पद आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून गेल्या ५६ वर्षांत पक्षात एवढी कधी फूट पडली नव्हती. पक्ष सत्तेवर असताना व पक्षप्रमुख स्वत: मुख्यमंत्री असताना पक्षावर ही वेळ यावी, यापेक्षा कोणते दुर्दैव असू शकते? एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याचा आनंद ठाकरे यांना व्हायला हवा होता. सामान्य शिवसैनिकाला ते स्वत: मुख्यमंत्री करू शकले नाहीत. पण तेच काम भाजपने करून दाखवले. एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या अपक्षांसह पन्नास शिवसेना आमदारांनी उद्धव किंवा शिवसेना यांची बदनामी होईल, असा एकही शब्द गेल्या दोन आठवड्यांत उच्चारलेला नाही, मग त्यांच्याविषयी ठाकरे यांना एवढा मत्सर का वाटतो? परवापर्यंत एकनाथ शिंदे हे कडवट शिवसैनिक वाटत होते. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करण्यात शिंदे यांचा मोठा वाटा आहेच. अनेक मोठ-मोठे कार्यक्रम व पक्षाच्या मोहिमा राबवताना शिंदे यांचे योगदान मोठे होतेच. पण ते मुख्यमंत्री होताच ठाकरेंना नकोसे झाले. आता त्यांना शिवसेनेतून काढून टाकल्याचे जाहीर करण्यात आले. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्राचा नाही, असले भावनिक संवाद फेकून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे दिवस केव्हाच संपले आहेत. ३७०वे कलम रद्द केल्यावर केंद्राला पाठिंबा देण्यास खळखळ केली, काश्मीर फिल्मला साधी करमाफी दिली नाही, हनुमान चालिसा म्हणणार अशी घोषणा करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवले, भाजपच्या नेत्यांवर पोलीस व प्रशासनाच्या कारवायांचा धडाका चालू ठेवला, अशा त्या लोकांना ‘भाजपने पाठित सुरा खुपसला’, अशी भाषा बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का?
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…