मुंबई : विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले. पक्षाप्रतिची निष्ठा, कुटुंबावर आलेला बिकट प्रसंग आणि बंडानंतर झालेली टीका याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले.
माझ्या कुटुंबाला प्राधान्य न देता मी कायम संघटनेसाठी झटत राहिलो. काही वेळा मी खचलोही, पण मला आनंद दिघेंनी आधार दिला, असेही शिंदेंनी सांगितले. मी बाळासाहेबांच्या विचाराने वेडा झालो होतो. आनंद दिघेंनी मला शाखाप्रमुख केले, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि आईमधल्या संभाषणाची आठवणही करुन दिली. तसेच आपल्यावर रेडे, प्रेतं आणि सोबत असलेल्या महिला आमदारांना वेश्या, अशा टिप्पण्या केल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.
आम्ही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि रहाणार
राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. पण आम्हाला फार चांगले अनुभव आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद कोणी लिखाण केले, बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्हाला गद्दार म्हटले गेले पण आम्ही कालही शिवसैनिक होतो आणि उद्याही शिवसैनिक राहणार असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना मानतो. मी शिवसेनेला कुटुंब मानत असल्याचे त्यांनी म्हटले.
विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अन्यायाविरोधात उभं राहण्यास सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर बाहेर पडलो. लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार हे त्याच दिवशी ठरवलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना व इतर अपक्ष असे ५० आमदार सोबत होते. माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात, असे नेहमी दिसून येतात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. महाराष्ट्रातील सत्तांतर ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची फक्त आपल्याच देशाने नव्हे तर तब्बल ३३ देशांनी दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
शिंदे यांनी म्हटले की, एका बाजूला सत्ता, सरकारी यंत्रणा होती. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सामान्य सैनिक होता. माझ्यासोबत आलेल्यांपैकी एकाही आमदाराने विचारलं नाही की किती दिवस लागतील. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असेही ते म्हणाले. आम्ही स्वार्थासाठी नव्हे विचारांसाठी एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आणि मुख्यमंत्री गहिवरले…
भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी उशीरा यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटूंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला, असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.