Tuesday, October 8, 2024
Homeमहाराष्ट्रपालघर'बोरिवली दर्शन' पर्यटन बससेवा

‘बोरिवली दर्शन’ पर्यटन बससेवा

संदीप जाधव

बोईसर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात येणाऱ्या बोईसर आगारामार्फत विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा बोरिवली दर्शन पॅकेज टूर अशी राबवण्यात येणार आहे. यापूर्वी वसईचा इतिहास, तसेच वसईतील पर्यटनस्थळे दाखवण्यासाठी वसई दर्शन नावाने बससेवा सुरू करण्यात आली. बोईसर आगारामार्फत बोरिवली दर्शन दिले जाणार आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाकडून पर्यटन बससेवा चालवण्यात येत आहेत. त्यानुसार एसटीच्या पालघर विभागातून पालघर जिल्ह्याशेजारील मुंबई येथील बोरिवली परिसरातील असलेल्या पर्यटनाची जनतेला माहिती होण्यासाठी विशेष अशी बोरिवली दर्शन पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय कार्यालयाने घेतला आहे. बोईसर आगारामार्फत बोरिवली दर्शन अशी पर्यटन सेवा पॅकेज टूर्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक आठवड्याच्या दर शुक्रवार आणि रविवार दिवशी सुरू करण्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे.

ही सहल साध्या बसमधून करण्यात येणार आहे. दर शुक्रवारी आणि रविवारी सकाळी ७ वा. बस सुटेल. किमान ३५ प्रवासी अपेक्षित आहेत. पालघर आणि बोईसर येथील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस, तर रविवारी शाळा, कॉलेज आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने रविवार महत्त्वाचा ठरणार आहे. ७ वाजता निघालेली बस रात्री ८ वाजता बोईसर येथे पोहोचणार आहे तिकीट दर ४२० रुपये आहे.

निरनिराळ्या पक्ष्यांचे दर्शन घडणार

प्रवाशांच्या सेवेसाठी खास बोरिवली दर्शनचा मार्ग बोईसर – पालघर बोरिवली (नॅशनल पार्क) – कान्हेरी लेणी – विश्व विपश्यना पॅगोडा परत असा असणार आहे. यात नॅशनल पार्क अभयारण्य असून, तिथे पाळीव तसेच रानटी प्राण्यांचे दर्शन घडवले जाणार आहे. निरनिराळे पक्ष्यांचेही दर्शन होणार आहे. प्राणिमित्र आणि पक्षिमित्रांसाठी अभयारण्य अनुकूल असून, त्यांना याठिकाणी अभ्यास करता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -