पणजी (हिं.स.) : बंडखोर शिंदे गटातील आमदार विशेष सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले. मात्र याआधी हा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून दोघांना अटक करण्यात आली. यातील सोनिया दोहान ही हरयाणाची, तर श्रेय कोटीयाल हा उत्तराखंड राज्यातील असून ते दोघे राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदार राहत असलेल्या हॉटेलमध्ये बोगस ओळखपत्राद्वारे प्रवेश करून राहणाऱ्या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नावे आणि बोगस ओळखपत्रांच्या आधारे ते दोघे रूम नंबर ६२५ मध्ये वास्तव्यास होते. बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी दुहा येथे आल्या असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कलम ४१९, ४२० अंतर्गत बोगस ओळखपत्र देणे आणि भलत्याच व्यक्तीच्या नावे हॉटेलमध्ये राहणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही बंड केले होते. त्यानंतर आमदारांना पळवून आणण्यात सोनिया दुहा यांची प्रमुख भूमिका असल्याचेही आता समोर येत आहे.
पणजीचे पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी याबाबत सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेले दोघे जण बनावट नावाने हॉटेलमध्ये दिवसभर थांबले होते आणि ओळख बदलून राहिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ते हेरगिरी करत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या आधारे त्यांना अटक केली आहे. मात्र अटक करण्यात आलेले दोघे जण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही.