Wednesday, July 17, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपर्यटकांना खुणावतोय सफाळेतील नयनरम्य तांदुळवाडी ‘वनदुर्ग’

पर्यटकांना खुणावतोय सफाळेतील नयनरम्य तांदुळवाडी ‘वनदुर्ग’

नवीन पाटील

सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पुर्वेकडील भागात असलेला ‘तांदुळवाडी गड’, हा निसार्गाच्या कुशीत वसलेला असून अनेक पर्यटक या ‘वनदुर्गाचे’ सौंदर्य पाहण्यासाठी भेटी देत असतात. ज्यामुळे तांदुळवाडी गावाला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

तांदुळवाडी किल्ला समुद्र सपाटीपासून १,८०० फूट उंचीवर असून गडावर अनेक पुरातन अवशेष आहेत. विशेष म्हणजे या गडावर पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा दिसतो. गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या पूर्वेस पायथ्याच्या जवळून सूर्या-वैतरणा नदी वाहत आहे. या वनदुर्गावर पाषाणात खोदलेले पाण्याचे जलकुंभ असून काही ठिकाणी तटबंदीच्या खुणाही आढळतात. सूर्या-वैतरणा नदी आणि वनदुर्गाच्या पायथ्याशी प्राचीन काळापासून ‘तांदुळवाडी’ नावाचे खेडे वसलेले आहे.

सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस ४.८० किमी अंतरावर तांदुळवाडी येथे हा किल्ला आहे. मराठ्यांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला हस्तगत केला होता. तांदुळवाडी गावाजवळच जलसंचयिका असून ती पोर्तुगीजांनी बांधली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका बहादुरशहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदूळवाडीचा किल्लेदार केले. त्यानंतर या भागात पोर्तुगीजांनी अंमल बसविला व पेशवाईत चिमाजी अप्पांच्या काळात हा किल्ला मराठ्यांनी सर केला, असे बोलले जाते.

किल्ल्याच्या पायथ्यापासून चढताना काही अंतरावर गडावर दगडांनी रचलेली अंदाजे चार फूट उंचीची तुटक अशी तटबंदी आहे. या तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यावर गडाच्या मध्यभागी एक चौकोनी हौद दिसतो. भिंतीच्या उजवीकडील बाजूस, थोडे खाली उतरल्यावर पश्चिम दिशेच्या टोकाकडून येणारी वाट दिसते. या वाटेवरून पुढे गडाच्या पूर्व-पश्चिम कड्याजवळ खडकात खोदलेली पाण्याची सुमारे २५ कुंडे किल्ल्याचे अस्तित्वच दर्शवितात. गडावरून आजूबाजुचा संपूर्ण परिसर दिसतो. या वनदुर्गाच्या परिसरात विविध वृक्ष-वेली, वनौषधी व अनेक जातीचे पशुपक्षी आढळतात. दरवर्षी या भागात मुसळधार पाऊस होत असून मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी होत असते. तथापि, पावसाळी हंगामात जंगलात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रानभाज्या येथे मुबलक प्रमाणात मिळत असून या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारांवर अतिशय गुणकारी असतात.

दरम्यान, तांदुळवाडी किल्ल्यावर मुंबईसह अनेक राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येत असतात. काही वेळेस या पर्यटकांना रात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज लागत नाही व पर्यटक भरकटतात. अशा घाबरलेल्या परिस्थितीत रस्ता चुकलेल्या पर्यटकांचा सफाळे पोलीस, पोलीस पाटील, पोलीस मित्र व ग्रामस्थ शोध घेऊन त्यांना जंगलातून सुखरूप खाली घेऊन येत असतात, अशी माहिती तांदूळवाडी गावचे पोलीस पाटील सुजित पाटील यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -